रणगाड्यांसह घुसले, विध्वंस घडवला अन्...; हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचा सर्जिकल स्ट्राइक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:19 PM2023-10-26T14:19:23+5:302023-10-26T14:26:59+5:30
Israel Hamas War - इस्रायली लष्कराने हमासला संपवण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. इस्रायलच्या ग्राऊंड फोर्सने उत्तर गाझा पट्टीत घुसून हमासची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली.
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने गाझाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. मात्र, जमिनीवरील कारवाईसाठी लष्कराकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. अशा स्थितीत इस्रायली लष्कराने हमासला संपवण्यासाठी नवा उपाय शोधला आहे. इस्रायलच्या ग्राऊंड फोर्सने उत्तर गाझा पट्टीत घुसून हमासची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली. एवढेच नाही तर हा सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर इस्रायली सैन्यही आपल्या सीमेवर परतलं आहे.
इस्रायली आर्मी रेडिओने हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान ही सर्वात मोठी घुसखोरी असल्याचं म्हटलं आहे. लष्कराने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. यामध्ये इस्त्रायली सैनिक चिलखती वाहनांतून गाझा सीमेवर कसे घुसले आणि रणगाड्यांमधून हमासच्या अनेक स्थानांवर हल्ला केला हे पाहता येईल. यामध्ये एन्टी टँक मिसाईल लॉन्च पोस्टचा समावेश होता.
In preparation for the next stages of combat, the IDF operated in northern Gaza.
— Israel Defense Forces (@IDF) October 26, 2023
IDF tanks & infantry struck numerous terrorist cells, infrastructure and anti-tank missile launch posts.
The soldiers have since exited the area and returned to Israeli territory. pic.twitter.com/oMdSDR84rU
इस्रायलच्या हल्ल्यात अनेक उद्ध्वस्त इमारतीही दिसत आहेत. हल्ला केल्यानंतर इस्रायली रणगाडे परतले. युद्धाच्या पुढील टप्प्याच्या तयारीसाठी ही घुसखोरी करण्यात आल्याचे लष्कराने निवेदनात म्हटले आहे. इस्रायली सैन्याने हमासला नष्ट करण्याचा हा संदेश होता. मात्र, याबाबत हमासकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हमास आणि इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनी संघटनांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला होता. या हल्ल्यात 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्लामिक जिहादने अजूनही 220 नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर इस्रायलचा जोरदार बॉम्बफेक सुरूच आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 6500 लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की यापैकी 2700 मुलं होती. त्याचबरोबर 17000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.