#Video : उपचारांचा निधी जमवण्यासाठी तरुणाचा २०० फूट उंचीवरुन दोरीवर चालण्याचा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 03:25 PM2017-12-15T15:25:34+5:302017-12-15T15:31:41+5:30
असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी त्याने २०० फुटांवरुन दोरीवर चालत जाण्याचा उपक्रम हाती घेतला.
फ्रान्स : तुम्हाला डोंबाऱ्याचा खेळ आठवत असेलच. आजही अनेक ठिकाणी डोंबारी पैशांसाठी हा दोरीवरचा खेळ खेळताना दिसतात. पण फ्रान्समध्ये एका अवलियाने असाध्य रोगांवर रिसर्च करण्यासाठी पैसे गोळा करण्याकरता असाच एक अचंबित करणारा खेळ केला आहे. आयफिल टॉवरच्याही उंचावर दोरीच्या सहय्याने हा अवलिया पोहोचलाय. अर्थात सरावाने आणि मागदर्शकांच्या निगराणीखाली त्याने ही उंची सर केलीय, त्यामुळे तुम्ही असे प्रयोग घरी करून पाहू नका.
डेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, २३ वर्षीय नाथन पाउलिन या तरुणाने जवळपास २०० फूट उंच हवेत चालण्याचा पराक्रम केलाय. तिकडच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या चॅनेलवर दाखवलाय. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. काहीजणांना उंच जाण्याची किंवा उंचावर गेल्यावर खाली पाहण्याची भिती वाटते. तर काहीजण त्याउलट उंचच उंच जाण्यासाठी सराव करताना दिसतात. त्यातलाच एक नॅथन पाउलिन. त्याने असाध्य रोगांवरील संशोधनासाठी पैसे जमा करण्याकरता हा पराक्रम केला. पाहा व्हिडीयो-
आयफेल टॉवर आणि ट्रोकाडेरो स्वेअरच्यामधून सेन नदी वाहते. या नदीवरून त्याने ही उंच गाठली आहे. ही उंची गाठताना त्याने दोरीचा वापर केला. २०० फुटांची ही दोरी सर करण्यासाठी त्याला अर्धा तास लागल्याचं सांगण्यात येतंय. तिथल्या स्थानिक वृत्त संस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त उंची गाठणारा नॅथन पहिला ठरला आहे. हा पराक्रम करण्यासाठी त्याने याचठिकाणी आदल्यादिवशी सराव केला होता. सराव यशस्वी झाल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबर रोजी सगळ्यांसमोर हा थरार सादर केला.
दोरींवरून सरसर चढतानाचा व्हिडिओ पाहताना प्रत्येकाच्याच पोटात गोळा तयार होतो. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने खाली वाकून सगळ्यांना चिअरअपही केलं. आपलं उद्दीष्ट साध्य झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याचा हा पराक्रम पाहण्यासाठी खाली लोकांनी गर्दीही केली होती. खरं म्हणजे, असाध्य रोगांवर उपचार मिळावेत याकरता संशोधन सुरू आहे.
हे संशोधन करण्यासाठी बऱ्याच पैशांची गरज भासणार आहे. त्यासाठी एका संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये असे अनेक साहसी खेळ करण्यासाठी अनेक उत्साही लोकांनी उपस्थिती दाखवली होती. यावेळी जवळपास ५० हून अधिक खेळ तरुणांकडून करण्यात आले. नॅथनने दोरीवरून सर केलेली उंचीही याच कार्यक्रमाचा भाग होता.
इतर जरा घटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.