Video: धक्कादायक! रुग्णांना जागा मिळेना, डॉक्टर बेशुद्ध पडताहेत; चीनमध्ये कोरोनाचा असा प्रकोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 01:36 PM2022-12-21T13:36:19+5:302022-12-21T13:46:10+5:30
कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे.
Corona China Updates: कोरोना महामारीची सुरुवात ज्या देशात झाली, त्या चीनमध्ये या महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. चीनमधील परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की, रुग्णांना ठेवण्यासाठी बेड नाहीत, मृतांना जाळण्यासाठी जागाही मिळेना. 24 तास अंत्यविधीसाठी वाट पाहावी लागत आहे. सध्या सोशल मीडियावर चीनमधील भीषण परिस्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
रुगणांच्या तपासणीदरम्यान डॉक्टर बेशुद्ध
चीनच्या चोंगकिंग शहरातील काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीदरम्यान एक डॉक्टर बेशुद्ध पडला. याशिवाय रुग्णालयात बेडची कमी असल्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवले जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण चिंतेत पडले आहेत. जगभरात कोरोना कमी झाला आहे, पण ही नवीन लाटेची चाहूल आहे का? असा प्रश्न लोकांना पडतोय.
官方说没有重症,看看重庆医科大学附属第一医院 急诊留观区域。 pic.twitter.com/UsGiKoS4gG
— iPaul🇨🇦🇺🇦 (@iPaulCanada) December 20, 2022
व्हॅक्सीन न घेतलेल्यांना पुन्हा लागण
चीनने देशव्यापी आंदोलनानंतर या महिन्यात झिरो कोव्हिड पॉलिसी हटवली होती. कडक नियम शिथिल करताच देशातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतलेली नाही. यात वृद्धांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या या लाटेसाठी हॉस्पिटल तयार नव्हते, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली.
सरकारी आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर
सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनमध्ये कोरोना आटोक्यात आहे. चीनमध्ये बुधवारी कोरोनाचे नवीन 3101 प्रकरणांची नोंद झाली. यासोबतच चीनमध्ये रुग्णांची एकूण संख्या 386,276 झाली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, चीनमध्ये आता फक्त श्वसनासंबंधी आजार झाला, तरच कोरोना मृतांमध्ये नोंद होणार. या नियमानुसार, 20 डिसेंबर रोजी चीनमध्ये कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला आहे.