व्हिएतनामची चीनला धमकी
By admin | Published: May 23, 2014 12:46 AM2014-05-23T00:46:22+5:302014-05-23T00:46:22+5:30
व्हिएतनामने चीनविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा गुरुवारी दिला आहे.
मनिला/वॉशिंग्टन : व्हिएतनामने चीनविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशारा गुरुवारी दिला आहे. चालू महिन्याच्या सुरुवातीला वादग्रस्त सागरी क्षेत्रात व्हिएतनामने तेल शुद्धीकरण यंत्रणा तैनात केली आहे. यानंतर व्हिएतनाममध्ये चीनविरोधी दंगली उसळल्या आणि या भागात उभय देशांतील जहाजांमध्ये तणावाची स्थिती उत्पन्न झाली आहे. पंतप्रधान नुएन तान डंग यांनी वृत्तसंस्थेच्या एका प्रश्नाला ई-मेलद्वारे पाठविलेल्या उत्तरात म्हटले, व्हिएतनाम मोठ्या हिमतीने आपल्या सागरी क्षेत्राचे संरक्षण करेल. स्वसंरक्षणासाठी कारवाई करण्यास आम्हाला भाग पाडल्यास सैन्य बळाचा वापर करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नसेल, असा इशाराही त्यांनी दिला.(वृत्तसंस्था) डंग यांनी राजधानी मनिला येथे फिलिपाईन्सच्या पंतप्रधानांशीही या मुद्यावर चर्चा केली. अन्य देशांप्रमाणेच व्हिएतनाम आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कारवाईसह अन्य अनेक पर्यायांवर विचार करीत आहे. मात्र, डंग यांनी व्हिएतनाम कोणत्या कायदेशीर पर्यायांचा विचार करीत आहे हे स्पष्ट केले नाही. केरींनी परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी व्हिएतनामचे आपले समपदस्थ तथा उपपंतप्रधान फाम बिन्ह मिन्ह यांना चीन मुद्यावर चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले आहे. परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० मे रोजी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेवेळी हे निमंत्रण देण्यात आले. मिन्ह यांनी द्विपक्षीय तसेच प्रादेशिक मुद्यावर विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने हे निमंत्रण देण्यात आले आहे. फोनवरील चर्चेवेळी केरी यांनी चीन-व्हिएतनाम यांनी या मुद्यावर संयम बाळगून तणाव कमी करण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. (वृत्तसंस्था)