तरुणाईसाठी व्हिएतनामचे फेसबुकवर पेज
By admin | Published: October 23, 2015 03:44 AM2015-10-23T03:44:59+5:302015-10-23T03:44:59+5:30
कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे. सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार
हनोई : कम्युनिस्ट व्हिएतनामने तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे. सरकारने या महिन्याच्या प्रारंभी फेसबुकवर एक पेज उघडले असून या पेजवरून सरकार व पंतप्रधानांबाबत लोकांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे.
फेसबुकवरील पेज हा पथदर्शक प्रकल्प असून हे पेज कसे काम करते यावरून सरकार त्याला आपले अधिकृत पेज बनविण्याचा विचार करणार आहे, असे सरकारच्या अधिकृत पोर्टलचे प्रमुख व्हीई क्वांग डाओ यांनी टुओई ट्रे या वृत्तपत्राला सांगितले. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हा या पेजचा उद्देश आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ३७ हजारांहून अधिक लाईक्स या पेजला मिळाल्या होत्या. गेल्या आठवड्यापेक्षा १३ पट अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
व्हिएतनामचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष देशातील राजकीय हालचाली, माध्यमांवर कडक निगराणी ठेवतो. फेसबुक वापरणाऱ्यांनी या साईटचा वापर करता येत नसल्याची तक्रार केली होती; मात्र सरकारने आपण इतर साईट अडविण्याचा प्रयत्न केला असला तरी ही साईट मात्र अडविली नसल्याचे सांगितले होते. व्हिएतनाममध्ये तरुणांची लोकसंख्या लक्षणीय आहे. ९० दशलक्ष लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश एवढे प्रमाण युवावर्गाचे आहे. (वृत्तसंस्था)