मला भारतात आणण्याचा आटापिटा निव्वळ मतांसाठी! विजय मल्ल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:34 AM2018-07-10T05:34:48+5:302018-07-10T05:35:03+5:30
भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.
लंडन: भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे.
ब्रिटिश फॉर्म्युला वन ग्रां प्री’ मोटारींच्या शर्यतीत मल्ल्याच्या मालकीचा ‘इंडिया वन’ संघ सहभागी होत आहे. शर्यतीच्या ठिकाणी आलेल्या मल्ल्याने एका वृत्तसंस्थेस सांगितले की, भारतातील तपासी यंत्रणा मला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करून घेऊन माझ्या मालमत्ता जप्त करण्याची धडपड करत आहेत. पण मी पळून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? आधीपासूनच माझे वास्तव्य ब्रिटनमध्ये आहे आणि मी अनिवासी भारतीय आहे. त्यामुळे मी ब्रिटनमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे जाणार? तरीही मला पळपुटा ठरविण्याचे राजकारण केले जात आहे.
भारतीय बँकांनी केलेल्या अर्जावर लंडनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटनमधील मालमत्तांची झडती घेण्यास अनुमती दिली आहे. त्याविषयी मल्ल्या म्हणाला की, ते खुशाल येऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की, बँका ज्या मालमत्तांबद्दल बोलत आहेत, त्या माझ्या नाहीत. लंडनच्या ग्रामीण भागातील आलिशान बंगला माझ्या मुलांचा आहे व लंडनमधील घर आईचे आहे. या मालमत्तांना ते हातही लावू शकत नाहीत. प्रश्न राहिला ब्रिटनमधील माझ्या मालमत्तांचा. काही मोटारी व काही रत्नाभूषणे एवढेच काय ते माझ्या नावावर आहे. त्या वस्तूंची यादी मी ब्रिटनमधील कोर्टात सादर केली आहे व हव्या तेव्हा स्वत: आणून देईन, तुम्ही तसदी घेण्याचीही गरज नाही, असेही कोर्टाला लिहून दिले आहे.
भारतातील थकीत कर्जे वसूल करण्यासाठी ‘सीबीआय’ व ‘ईडी’ माझ्या भारतातील मालमत्तांवर
डोळा ठेवून आहेत. पण अशा दोन अब्ज डॉलरहून अधिक मालमत्तांची यादी मी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे आधीच दिलेली आहे. त्या मालमत्ता कर्जे फेडूनही शिल्लक राहतील एवढ्या आहेत. त्या विकण्यास काहीच अडचण नाही. शिवाय
मीही पैसे उभे करण्यासाठी आणखी काही मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ब्रिटनमधील किंवा इतर ठिकाणच्या मालमत्ता कर्जफेडीत आणण्याचा प्रश्नच येत नाही. (वृत्तसंस्था)
हा घोर अन्याय
मी या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे व त्यासाठी त्यांना ‘मनी लॉड्रिंग’ कायद्याचा आधार घेतला आहे, पण हे करताना ‘ईडी’ने मला वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तांवरही टांच आणली आहे. त्यातील काही सन १९२० पासूनच्या आहेत. हा घोर अन्याय आहे.
-विजय मल्ल्या, माजी ‘किंग आॅफ गूड टाइम्स’