विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर
By Admin | Published: June 13, 2017 06:17 PM2017-06-13T18:17:00+5:302017-06-13T18:32:56+5:30
न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे.
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - भारतीय बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयच्या न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असंही विजय माल्यानं सुनावलं आहे. मी माझ्यावरील सर्व आरोप नाकारतो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असंही माल्यानं सांगितलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी माल्याच्या अटकेसाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी संचलनालयाचे काही अधिकारीही लंडनमध्ये गेले होते. मात्र त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं होतं.
फरार घोषित केलेल्या विजय माल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणात विजय माल्याला गेल्या महिन्यात लंडनमध्ये अटकही केली होती. मात्र काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली. भारताच्या अपीलवर माल्याला स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही देशांमध्ये विजय माल्याच्या मुद्द्यावर करारही झाला होता. विजय माल्याला भारतात आणणं मोदी सरकारसाठी मोठं आव्हान ठरत आहे. भारतानं लंडनमधून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी कूटनीतीचासुद्धा उपयोग केला होता.
आता ते प्रकरण तिथल्या स्थानिक कोर्टात आहे. माल्याच्या अटकेनंतर ब्रिटिश कोर्टानं त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी भारतातून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांसह एक टीम लंडनमध्ये दाखल झाली आहे. विजय माल्या स्वतःच्या प्रत्यार्पणाला आव्हानही देऊ शकतो. माल्या प्रत्यार्पणाला राजकारणाच्या दृष्टीने अटक करत असल्याचा आरोप करत त्याला विरोधही करू शकतात. स्वतःच्या प्रत्यार्पणाला माल्या मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचा स्पष्ट करण्याचाही प्रयत्न करू शकतो.