ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यात विजया गड्डेंची महत्त्वाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:19 AM2021-01-13T03:19:46+5:302021-01-13T03:19:59+5:30
गड्डे या ट्विटरच्या कायदा तसेच सुरक्षा प्रमुख
न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यामागे मायक्रोब्लॉगिंग साईटच्या ज्येष्ठ विधिज्ञ भारतवंशीय विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका होती. हा महत्त्वाचा निर्णय ट्रम्प समर्थकांच्या अमेरिकी संसदेवरील हल्ल्यानंतर घेण्यात आला होता.
हैदराबादेत जन्मलेल्या ४५ वर्षीय गड्डे या ट्विटरच्या कायदा, लोकनीती व विश्वास तसेच सुरक्षा प्रमुख आहेत. शुक्रवारी त्यांनीच ट्विट करून ट्रम्प यांचे अकाऊंट आणखी हिंसेची जोखीम पाहता ट्विटरवरून कायमस्वरूपी निलंबित केले जात आहे, अशी माहिती दिली होती. ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले तेव्हा त्यांचे ८.८७ कोटी फॉलोअर्स होते; तसेच ते ५१ जणांना फॉलो करीत होते.
गड्डेयांच्या ट्विटर प्रोफाईलनुसार, २०११मध्ये त्या कंपनीशी जोडल्या गेल्या. त्यापूर्वी त्या अमेरिकी कंपनी जूनिपर नेटवर्क्समध्ये वरिष्ठ विधिज्ञ संचालक होत्या. त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये लॉ फर्म विल्सन सेन्सिनी गुडरिक अँड रोसाटीमध्ये सुमारे एक दशकभर काम केले आहे. त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी लॉ स्कूलच्या विश्वस्त मंडळात व जागतिक मानवीय साहाय्य व विकास संघटना मर्सी कॉर्प्सच्या संचालक मंडळातही होत्या. त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून ज्यूरिस डॉक्टर (जेडी) ची पदवी मिळविली होती. यापूर्वी त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये बी. एस्सी. केली होती. त्या बालपणी आई-वडिलांसमवेत अमेरिकेत आल्या होत्या. त्यांचे बहुतांश बालपण टेक्सास व न्यूजर्सीमध्ये गेले. त्यांना कथा, साहित्य, वाचन, पर्यटन व स्वयंपाक करण्यासही आवडते.
ट्विटर प्रमुख जॅक डोर्सी यांनी २०१९मध्ये ट्रम्प यांची भेट घेतली होती तेव्हा विजया त्यांच्यासमवेत होत्या. दलाई लामा यांची डोर्सी यांनी भेट घेतली होती, तेव्हाही त्या त्यांच्यासमवेत होत्या. एका अहवालानुसार, ट्विटर मुख्यालयात त्या व डोर्सी यांचे कॅबिन नजिक आहेत. ट्विटरच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयात त्यांचा सहभाग असतो. (वृत्तसंस्था)