आधी नाकातोंडातून रक्तस्राव, नंतर थेट मृत्यू; रहस्यमयी आजारामुळे एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 10:25 AM2020-03-03T10:25:20+5:302020-03-03T10:28:15+5:30
रहस्यमयी आजारामुळे स्थानिक चिंतेत; चिनी कंपनीकडे संशयाची सुई
अद्दीस अबाबा: एकीकडे जवळपास संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसत असताना दुसरीकडे इथिओपियात एका रहस्यमयी आजारानं दहशत माजवलीय. आधी नाकातोंडातून रक्तस्राव आणि त्यानंतर थेट मृत्यू असे प्रकार इथिओपियातल्या गावांमध्ये घडताहेत. चिनी कंपन्यांकडून सुरू असलेल्या तेल उत्खननातून विषारी पदार्थ सोडले जात असल्यानं हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
सोमाली भागात असलेल्या वायू प्रकल्पाजवळील गावांमध्ये एका आजाराची साथ पसरलीय. या आजाराची बाधा झालेल्यांचे डोळे ताप येण्यापूर्वी पिवळे होत आहेत. त्यानंतर त्यांच्या शरीराला सूज येत असून थेट मृत्यू ओढावत आहे. तळव्यांचा रंग पिवळसर होणं, भूक कमी होणं, निद्रानाश अशी लक्षणंदेखील या आजाराच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. मात्र या भागातलं वातावरण राहण्यास अयोग्य असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. परिसरातली परिस्थिती सुयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.
आजाराचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र परिसरातल्या पाण्यात रसायनं मिसळलं गेल्यानं हा प्रकार घडत असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. स्थानिक रहिवासी खादर अब्दी अब्दुल्लाही यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दल आरोप केला होता. परिसरात पसरलेल्या आजारासाठी त्यांनी पाण्यात सोडण्यात येणाऱ्या रसायनांना जबाबदार धरलं होतं. यानंतर अब्दुल्लाही यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आपण या आजारावर पुरेसे उपचार करू शकत नसल्याचं म्हणत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
अनेकांसाठी जीवघेणा ठरलेला आजार आपल्यासाठी संपूर्णपणे नवा असल्याचा दावा सोमाली सरकारच्या सल्लागारानं केला. पॉली-जीसीएल कंपनी मानवी आरोग्यास हानिकारक रसायनं वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं. चिनी कंपनी पॉली-जीसीएलनं गेल्याच वर्षी इथिओपिया ते द्जीबौटी दरम्यान गॅसवाहिनी टाकण्याची घोषणा केली. इथिओपियातला गॅस लाल समुद्रापर्यंत वाहून नेण्याचं काम या गॅसवाहिनीच्या माध्यमातून केलं जाईल.