प्रचार कायद्याचे उल्लंघन; लेखक डिसुझा यांना शिक्षा
By admin | Published: September 25, 2014 03:13 AM2014-09-25T03:13:15+5:302014-09-25T03:13:15+5:30
अमेरिकेच्या निवडणूक प्रचार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय-अमेरिकन लेखक दिनेश डिसुझा यांना थेट तुरुंगवास न ठोठावता पाच वर्षे परिविक्षावास
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या निवडणूक प्रचार कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल भारतीय-अमेरिकन लेखक दिनेश डिसुझा यांना थेट तुरुंगवास न ठोठावता पाच वर्षे परिविक्षावास, समाजसेवा आणि ३० हजार अमेरिकन डॉलरचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
५३ वर्षी दिनेश डिसुझा हे कॅलिफोर्नियाचे असून अमेरिकी जिल्हा न्यायाधीश रिचर्ड बर्मन यांनी मंगळवारी डिसुझा यांना ही शिक्षा सुनावली. अमेरिकी सिनेटच्या प्रचारादरम्यान निवडणूक प्रचार कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवीत मॅनहटनस्थित संघीय न्यायालयाने त्यांना पाच वर्षे परीविक्षा काळात राहण्याची शिक्षा सुनावली. यापैकी पहिल्या वर्षात दरदिवशी ८ तास समाजकेंद्रात राहून सेवा द्यावी लागेल. मूळचे मुंबईकर दिनेश डिसुझा हे बराक ओबामा यांचे टीकाकार आणि रुढीवादी म्हणून ओळखले जातात.
डिसुझा यांनी १० हजार डॉलरपेक्षा अधिक निधी बेकायदेशीरपणे प्रचारासाठी दिला होता. मला तुरुंगवास देण्याऐवजी परीविक्षा आणि समाजसेवेची शिक्षा द्यावी, अशी विनंती डिसुझा यांनी केली होती. (वृत्तसंस्था)