ट्रम्पविरोधी निदर्शनांना हिंसेचे गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2017 12:39 AM2017-01-22T00:39:17+5:302017-01-22T00:39:17+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला विरोध करण्यासाठी राजधानी वॉशिंग्टनसहअमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लोकांनी तीव्र निदर्शने करण्यात केली.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला विरोध करण्यासाठी राजधानी वॉशिंग्टनसहअमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लोकांनी तीव्र निदर्शने करण्यात केली. वॉशिंग्टनमध्ये उसळलेल्या हिंसाचारात २ पोलीस अधिकारी आणि एक नागरिक जखमी झाला. पोलिसांनी २१७ जणांना
अटक केली. निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी तिखट स्प्रेचा वापर केला.
वॉशिंग्टनचे पोलीस प्रमुख पीटर न्यूशम यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांच्या जखमा किरकोळ आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वॉशिंग्टनमध्ये निदर्शकांनी सुमारे अर्धा डझन दुकानांची तोडफोड केली, तसेच काही वाहने फोडली. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. निदर्शक फॅसिस्टविरोधी पोशाख घालून आले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना तिखट स्प्रेचा वापर करावा लागला. न्यूयॉर्क, सिएटल, डलास, शिकागो आणि पोर्टलँड इ. अनेक शहरांतही ट्रम्प विरोधकांनी निदर्शने केली. काही तुरळक प्रकार वगळता निदर्शने शांततेत पार पडली, असे पोलिसांनी सांगितले.
शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी लिबर्टी बॉलला भेट दिली. तेथे त्यांनी महान अमेरिकी गायक फ्रँक सितात्रा यांच्या ‘आय डिड ईट माय वे’ या गाण्यावर पारंपरिक ‘प्रथम नृत्य’ केले. त्यावेळी देशभर त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू होती. (वृत्तसंस्था)
फलश्रुतीला महत्त्व देणार
आपण आता केवळ कामाला महत्त्व देणार असल्याचे जाहीर केले. ‘आता खेळ बंद. काम सुरू झाले आहे. आम्ही तुमच्यासाठी काम करू. कामाच्या फलश्रुतीकडे लक्ष दिले जाईल.’ त्यानंतर त्यांनी ओबामाकेअर ही आरोग्य योजना बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ओबामाकेअर योजना बंद होणार असली तरी वाजवी दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात जेम्स मॅटीस आणि जॉन केली या दोन नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.