अमेरिकेतील हिंसाचार नियंत्रणाबाहेर; 17 हजार सुरक्षा सैनिक रस्त्यांवर तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:02 AM2020-06-03T06:02:40+5:302020-06-03T06:02:55+5:30
फ्लॉईड याच्या मृत्यूची झळ आता १४० शहरांना बसू लागली आहे. गेल्या काही दशकांमधील अशांततेची ही मोठी घटना आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरु असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीय. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड याच्या पोलिसांनी केलेल्या क्रूर हत्येमुळे मोठे आंदोलन सुरु झाले आहे. जाळपोळ, लुटालूट सुरु आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २४ राज्यांमध्ये १७ हजार सैनिकांना रस्त्यावर उतरवावे लागले आहे.
फ्लॉईड याच्या मृत्यूची झळ आता १४० शहरांना बसू लागली आहे. गेल्या काही दशकांमधील अशांततेची ही मोठी घटना आहे. यावर व्हाईट हाऊसने सांगितले की, हिंसा, लुटालूट, अराजकता आणि अव्यवस्थेला सहन केले जाऊ शकत नाही. व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव केली मॅकनेनी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की जे काही रस्त्यावर दिसत आहे ते मान्य नाही. हे गुन्हेगारी कृत्य आहे. नाही आंदोलन आहे, नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ही वृत्ती निरपराध अमेरिकी नागरिकांना नुकसान पोहोचवत आहे.
अमेरिकेकडे जवळपास ३.५ लाख राष्ट्रीय सुरक्षा दलाची कुमक आहे. त्यापैकी १७ हजार सैनिकांना बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरविण्यात आले आहे. संघराज्यातील २४ राज्यांमध्ये हे सैनिक तैनात आहेत. यामुळे गव्हर्नरांना आंदोलन थांबविण्यासाठी कारवाई करावीच लागणार आहे. कारण हे अमेरिकी समुहाला वाचविण्यासाठी गरजेचे आहे. जर गव्हर्नरांनी सुरक्षा दलाला तैनात केले नाही, तर आम्हाला सैन्याला पाचारण करावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.