बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला, व्हॉट्सॲप-युट्यूबसह सोशल मीडियावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:56 AM2024-08-03T08:56:25+5:302024-08-03T08:56:55+5:30
बांगलादेश सरकारने पुन्हा एकदा व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुकसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. सरकारविरोधातील निदर्शने पुन्हा एकदा तीव्र झाली आहेत.
बांगलादेशात शुक्रवारी पुन्हा पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा समोर आलं आहे, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ही निदर्शने केली जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने देशभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. शुक्रवारी सरकारने इन्स्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून देशभरातील सोशल मीडिया साइटवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी तुर्कीनेही अशीच कारवाई करत इंस्टाग्रामवर बंदी घातली होती. बांगलादेश सरकारने दुपारी १२ नंतर मोबाईलवरील मेटा प्लॅटफॉर्मचे नेटवर्क मर्यादित केले. इंटरनेट स्पीड देखील कमी करण्यात आले आहे, यामुळे व्हीपीएन वापरूनही सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही. १७ जुलै रोजी पहिल्यांदा इंटरनेट बंद करण्यात आले होते. यानंतर १८ जुलै रोजी ब्रॉडबँड इंटरनेटही बंद करण्यात आले. २८ जुलैपर्यंत मोबाईल नेटवर्कवर बंदी होते.
पुन्हा निदर्शने सुरू झाली
राजधानी ढाक्याच्या वेगवेगळ्या भागात दोन हजारांहून अधिक आंदोलक जमले, त्यापैकी काही 'हुकूमश विरोधात' आणि 'पीडितांना न्याय द्या' अशा घोषणा देत होते, तर पोलिस अधिकारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. ढाक्याच्या उत्तरा भागात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापटही झाली. तर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या.
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात आंदोलन सुरू आहे. सध्या ही निदर्शने कमी होण्याची चिन्हे नाहीत. १५ जुलै रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून निदर्शने हे पंतप्रधान शेख हसीना यांच्यासाठी मोठे संकट बनले आहे. हिंसक निषेध थांबवण्यासाठी इंटरनेट बंद केले आहे, शाळा आणि विद्यापीठे बंद आहेत.