इस्रायलच्या हल्ल्यावरून लोकसभेत गदारोळ
By Admin | Published: July 16, 2014 02:18 AM2014-07-16T02:18:25+5:302014-07-16T02:18:25+5:30
गाझापट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या मुद्यांवरून लोकसभेत आज विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला आणि या हल्ल्याचा निषेध प्रस्ताव आणण्याची मागणी केली. परंतु सरकारने असा प्रस्ताव आणण्यास नकार दिला
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
गाझापट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या मुद्यांवरून लोकसभेत आज विरोधी पक्षांनी प्रचंड गोंधळ घातला आणि या हल्ल्याचा निषेध प्रस्ताव आणण्याची मागणी केली. परंतु सरकारने असा प्रस्ताव आणण्यास नकार दिला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सरकारच्या विरोधात मोकळ्या जागेत आलेल्या खासदारांसोबत दिसून आले.
सरकारने निषेध प्रस्ताव आणण्यास नकार दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि पीडीपीच्या सदस्यांनी सभात्याग केला.
इस्रायलचा निषेध प्रस्ताव आणण्याची आणि गाझा पट्टीतील नरसंहाराविरोधात संयुक्त राष्ट्रात मुद्दा उपस्थित करण्याची मागणी करीत काँग्रेस, एनसीपी, तृणमूल काँग्रेस, डावे, सपा, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि पीडीपी आदी पक्षांनी लोकसभेत गोंधळ घातला. यावर संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी सदस्यांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद केल्याचे सांगितले. देशांतर्गत राजकारणाचा आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम व्हायला नको. सरकारने उचललेल्या कुठल्याही पावलांमुळे त्यावर परिणाम व्हायला नको, असेही नायडू म्हणाले.
सरकारकडून आलेल्या उत्तरामुळे गोंधळाला सुरुवात झाली. नायडू कुठल्या परिणामाबद्दल बोलत आहेत, असा सवाल सदस्यांनी केला. सदस्यांनी मत व्यक्त केले आहे. ते सरकारला निवेदन सादर करण्यास बाध्य करू शकत नाही, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या.
सरकारच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करताना काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि पीडीपीच्या सदस्यांनी सभात्याग केला.