म्यानमारमध्ये सैन्य आणि बंडखोरांमध्ये हिंसक चकमक, 30 सैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 02:42 PM2021-10-13T14:42:55+5:302021-10-13T14:43:13+5:30
या वर्षी 1 फेब्रुवारीला झालेल्या सत्तांतरानंतर हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत.
नायपिताव:म्यानमार देशात मोठी हिंसक चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर आणि बंडखोर गटात झालेल्या चकमकीत किमान 30 सैनिक ठार झाले आहेत. म्यानमारमधील जुंटा सैन्याने परिसरातील बंडखोरांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं होतं, यादरम्यान ही हिंसक चकमक झाली. रेडिओ फ्री एशियाने पीपल्स डिफेन्स फोर्सच्या सदस्यांचा हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "सैन्याचे वरिष्ठ कमांडर आपल्या तुकडीसह पेल टाऊनशिपकडे येत होते. त्यांच्यासोबत सैन्याची 23 वाहने होती. यादरम्यान सोमवारी सकाळी पेल टाऊनशिपच्या बाहेर बंडखोरांच्या गटाने लावलेल्या लँडमाइनवर गाडी येताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात कमांडरसह किमान 30 सरकारी सैनिक ठार झाले.''
सत्तांतरानंतर परिस्थिती बिघडली
या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या लष्करी बंडानंतर म्यानमारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. लष्कर प्रमुख, वरिष्ठ जनरल मिंग आंग हलिंग यांनी वर्षभर आणीबाणीची स्थिती जाहीर केली. आणीबाणीनंतर लष्कराला म्यानमारच्या नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान अनेकदा हिंसक घटना घडल्या आहेत. एका रिपोर्टनुसार, मागील आठ महिन्यांत 1167 नागरिकांच्या विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यात सैन्य आणि बंडखोरांमध्ये हिंसक चकमकीच्या 132 घटना घडल्या आहेत.