Pakistanमध्ये दोन गटांमध्ये भीषण संघर्ष, तुफान गोळीबारात १० जणांचा मृत्यू, हल्ल्यासाठी रॉकेट लाँचरचाही वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:20 AM2021-10-25T08:20:25+5:302021-10-25T08:21:06+5:30
Pakistan News: पाकिस्तानमधील आदिवासी भागामध्ये जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान वादावादी झाली. या वादामधून झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील आदिवासी भागामध्ये जंगलातील जमिवीवर कब्जा करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान वादावादी झाली. या वादामधून झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. ही घटना पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात घडली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा वाद शनिवारी दुपारनंतर सुरू झाला. पेशावरपासून २५१ किमी अंतरावर असलेल्या खुर्रम जिल्ह्यातील तेरी मेगल गावात राहणाऱ्या गैदू टोळीच्या लोकांनी सरपणासाठी लाकूड गोळा करणाऱ्या पेवार टोळीच्या सदस्यांवर गोळीबार केला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, खुर्रम जिल्ह्यातील सबडिव्हिजवनमध्ये जंगलातील मालकी हक्कावरून दोन गटांमध्ये वाद आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तणाव सुरू होता. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या धुमश्चक्रीमध्ये चार जणांचा मृत्यू शनिवारी तर सहा अन्य लोकांचा मृत्यू पेवार समुदायाच्या लोकांना रविवारी केलेल्या प्रतिहल्ल्यात झाला. बंदुकधाऱ्यांनी लपून हल्ला केला. यावेळी दोन्हीकडून मोठी हत्यारे आणि रॉकेल लाँचरचा वापर झाला.
उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खुर्रम जिल्ह्याची सीमा अफगाणिस्तानला लागून आहे. येथे बंदुकीचा वापर आणि दहशतवादी हल्ले नेहमी होत असतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही समुदायामधील जेष्ठ व्यक्ती आणि सरकारी अधिकारी गैदू आणि पेवार टोळीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पोलीस आणि निमलष्करी दलांना परिसरात पाठवण्यात आले आहे. माहिती मिळेपर्यंत दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली.