बेपत्ता विद्यार्थ्यांबाबतच्या निदर्शनांना हिंसक वळण
By admin | Published: December 3, 2014 01:20 AM2014-12-03T01:20:54+5:302014-12-03T01:20:54+5:30
४३ बेपत्ता मेक्सिकन विद्यार्थ्यांसंदर्भात आयोजित शांततापूर्ण आंदोलनाचा राजधानीत सोमवारी हिंसाचारात शेवट झाला.
मेक्सिको सिटी : ४३ बेपत्ता मेक्सिकन विद्यार्थ्यांसंदर्भात आयोजित शांततापूर्ण आंदोलनाचा राजधानीत सोमवारी हिंसाचारात शेवट झाला.
मेक्सिको सिटीच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. बेपत्ता विद्यार्थ्यांचे हत्याकांड झाल्याचे मानण्यात येते. मोर्चेकऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष एन्रिक पेना नाईटो यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. ‘एंजल आॅफ इण्डिपेण्डन्स मोनुमेन्ट’ येथे आयोजित मेळाव्यात बेपत्ता विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी झाले होते. त्यांना उद्देशून मोर्चेकऱ्यांनी ‘तुम्ही एकटे नाही आहात’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान, अंधार होताच मुखवटे परिधान केलेल्या आंदोलकांच्या एका छोट्या गटाने राजधानीतील बँकांवर आगीच्या गोळ्यांचा मारा करून अनेक दुकानांच्या खिडक्या फोडल्या. सिनेटचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनी निदर्शकांना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्यावर अग्निशमन यंत्राच्या फवाऱ्याचा मारा करून चार जणांना ताब्यात घेतले. गुईरेरो राज्यात निदर्शकांच्या एका गटाने राज्य अधिवक्त्याच्या कार्यालयात तोडफोड करून दोन पोलीस वाहनांसह पाच वाहने जाळली. (वृत्तसंस्था)