‘शेवटचा’ व्हिडीओ.. प्लीज माझं पाप पोटात घ्या; सर्वस्व गेलं, तरीही ‘जग माझं आहे’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:00 AM2023-02-21T10:00:40+5:302023-02-21T10:01:00+5:30
अगदी छोटासा हा व्हिडीओ, पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर व्हायरल होतो आहे.
भूकंपात एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखी ती चारमजली इमारत कोसळली. याच इमारतीत ताहा एर्डेम हा १७ वर्षीय तरुण राहत होता. इमारतीच्या या कोसळलेल्या ढिगाऱ्यात तोही गाडला गेला. निदान आत्ता, या क्षणाला तरी त्याचा श्वासोच्छवास सुरू होता. अंगावर दगड-विटांचा ढिगारा कोसळतच होता. आता काही सेकंदात आपण धरतीच्या पोटात कायमचे गडप होऊ, याची आणखी गडद जाणीव त्याला झाली. कारण मातीचा ढिगारा खाली खचत चालला होता. तोही हळूहळू त्या ढिगाऱ्यात दबला जात होता. भूकंपाचे धक्के अजूनही बसतच होते. जमीन हलत होती. तशाही स्थितीत त्यानं आपल्या खिशातून मोबाइल कसाबसा काढला. सुदैवानं तो अजून चालू अवस्थेत होता. त्यानं आपला व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आपण तर आता जगणार नाही, पण आपल्यानंतर आपल्या घरच्यांपर्यंत, नातेवाइकांपर्यंत तरी कदाचित आपले शब्द पोहोचतील, या हेतूने त्याही अवस्थेत मोबाइलवर त्यानं शूटिंग करायला सुरुवात केली.
त्याचा हात, मोबाइल थरथरत होता, कारण धरती दोलायमान होत होती. त्याच्या आवाजातही कंप होता. हा माझा शेवटचा व्हिडीओ आणि माझं हे शेवटचं बोलणं. यानंतर, मी आता कधीच कोणाला दिसणार नाही आणि माझा आवाजही कोणाला ऐकू येणार नाही. कारण या राक्षसी भूकंपातून मी जिवंत बाहेर येईन, याची शक्यताच नाही. कोणत्याही क्षणी मृत्यू माझ्यावर अखेरचा घाव घालेल. त्या आधी मला माझं शेवटचं बोलून घेऊ द्या, असं काही होईल आणि तेही इतक्या लवकर, याची मी कल्पनाच केलेली नव्हती, पण मी केलेल्या चुका मला आता आठवत आहेत. त्या मला आता कधीच सुधारता येणार नाहीत. माझ्या या चुकांबद्दल मी साऱ्यांचा दिलगीर आहे. हे जगन्नियंत्या, जमलंच तर आजवर मी केलेल्या साऱ्या पापांबद्दल मला क्षमा कर. माझ्या हातून चुका झाल्या, हे मला आत्ता जास्त तीव्रतेनं लक्षात येतं आहे, पण मला बरंच काही चांगलंही करायचं होतं. जिवंत राहिलो असतो, तर कदाचित ते केलंही असतं. अजूनही धरती कंप पावते आहे. मला बाहेर पडणं अशक्य आहे. मी तर आता या जगात राहाणार नाही, पण मला वाटतं, माझे आई-वडील, भाऊ, बहीण... कोणीच या प्रलयकारी भूकंपातून वाचले नसतील. मी बहुदा सर्वांनाच गमावलं आहे...” असं म्हणून तो आपली शेवटची प्रार्थना म्हणायला लागतो...
अगदी छोटासा हा व्हिडीओ, पण सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर व्हायरल होतो आहे. ताहाच्या समयसूचकतेचं, त्याच्या धाडसाचं, त्याच्या प्रांजळ प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तुर्कस्तानात नुकताच जो विनाशकारी भूकंप झाला, तेथील भयाण वास्तवाचं प्रतिबिंब दाखविणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. तुर्कस्तानात अनेक ठिकाणी भूकंप झाले, पण ताहा ज्या अदियामन या शहराचा तो रहिवासी, तिथे या भूकंपाची तीव्रता खूपच मोठी होती. केवळ त्यांच्याच इमारतीतले तब्बल ४७ जण या भूकंपात मृत्युमुखी पडले.
आपला हा आता अखेरचा क्षण, असं ताहाला वाटलं होतं, पण त्याचं नशीब बलवत्तर, भूकंप झाल्यानंतर ज्या लोकांना सर्वांत पहिल्यांदा जिवंतपणी बाहेर काढण्यात आलं, त्यात ताहाचाही नंबर होता. भूकंपानंतर केवळ दोन तासांत त्याला आजूबाजूच्या नगरिकांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. ढिगारा उपसण्यासाठी त्यांच्याकडे काहीही साधनं नव्हतं, कुठलीही उपकरणं नव्हती, तरीही जे मिळेल ते हाती घेऊन आणि नुसत्या हातानं ढिगारा उपसून या लोकांनी अनेकांना नवा जन्म दिला. त्यात ताहाही होता. पण केवळ ताहाच नाही, त्याचं अख्खं कुटुंबच नशीबवान होतं. भूकंपानंतर ताहाचे आई-वडील आणि त्याच्या लहान बहीण-भावालाही ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं. ज्यावेळी भूकंप झाला, त्यावेळी ताहाची ३७ वर्षीय आई झेलिहा, स्वत:च्या जीवापेक्षा आपल्या मुलांच्या नावानंच हाका मारत होती. तिलाही कळून चुकलं होतं, आपण आता यातून वाचत नाही, पण आपल्या मुलांनी तरी हे जग पाहावं, अशी तिची मनोमन इच्छा होती. अर्थातच, तिच्या हाका कोणालाच ऐकू आल्या नाहीत. कारण इमारत कोसळल्याचा धमाका आणि आसमंत चिरणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या यात तिच्या हाका कुठल्या कुठे विरून गेल्या होत्या.
सर्वस्व गेलं, तरीही ‘जग माझं आहे!’
ताहाची आई झेलिहा सांगते, एकच मोठा धक्का बसला आणि बघता बघता इमारतीचे एकेक मजले खाली बसू लागले. त्यात आम्ही दाबले गेलो. आत्ता या क्षणाला आमच्याकडे काहीही नाही. आमच्या घराची ‘राख’ समोरच्या ट्रकमध्ये टाकून बाहेर फेकली जात आहे, तरीही आज मी म्हणू शकते, हे जग माझं आहे. कारण माझ्या कुटुंबातले सारेच वाचले आहेत!...