४ वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या मुलीची आईसोबत झाली पुन्हा भेट; कोरियाने आणला 'हा' नवा आविष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 03:37 PM2020-02-11T15:37:53+5:302020-02-11T15:45:28+5:30
सुरुवातीला आईच्या मनात आपल्या मुलीला जवळ घेण्यासाठी चलबिचल सुरु होती.
नवी दिल्ली - तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण हे खरं आहे की टेक्नोलॉजीच्या सहाय्याने एखाद्या मृत व्यक्तीला तुम्ही भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. अलीकडेच असा किस्सा कोरियातील एका टेलिव्हिजन शोमध्ये पाहायला मिळाला आहे. 'मिटींग यू' नावाच्या टीव्ही शोमध्ये एक आई तिच्या मुलीला भेटते. या मुलीचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता. शोमध्ये आईला तिच्या ७ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी व्हर्चुअल रिएलिटीचा वापर करण्यात आला.
या कमाल टेक्नोलॉजीमुळे मृत्यूनंतर ४ वर्षांनी एक आई तिच्या मुलीला भेटते फक्त इतकचं नाही तर आई तिच्याशी संवादही साधला. संवादामध्ये मुलीने तिच्या आईला सांगितले की, तिला सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आईला आपल्या मुलीचा स्पर्श व्हावा यासाठी टच सेन्सेटिव्ह ग्लव्स आणि ऑडिओचा वापर करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजकांनी आईला मुलीसोबत भेट घडवण्यासाठी वाइव व्हर्चुअल रिएलिटी हेडगियर देण्यात आलं.
त्यानंतर आईला एका गार्डनमध्ये नेण्यात आलं. त्याठिकाणी तिची मुलगी उभी राहून आईकडे पाहत हसत होती. मुलीला इतक्या वर्षाने पाहिल्यानंतर आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई आणि मुलीची भावूक भेट झाली. यामध्ये मुलीने आईला सांगितलं की, मला तुझी खूप आठवण येते.
कोरियाची कंपनी Munhwa Broadcasting Corporation ने या मुलीचा चेहरा डिझाईन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये त्यांनी मृतक मुलीचा चेहरा, शरीर आणि आवाज हूबेहूब ठेवण्यासाठी कसरत केली कारण आईला आपल्या मुलीसोबत असल्याचा पूर्णपणे भास होईल.
सुरुवातीला आईच्या मनात आपल्या मुलीला जवळ घेण्यासाठी चलबिचल सुरु होती. त्यानंतर मुलीच्या सांगण्याने आईने तिचा हात पकडला. हात पकडताच आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. हा कार्यक्रम पाहणारे मुलीचे वडील, भाऊ-बहिण यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
थोड्या वेळानंतर या व्हर्चुअल प्रवासाचा शेवट करण्यात आला. मुलीने आईला सांगितले की, मी थकली आहे, मला झोपायचं आहे. ज्यानंतर आईने आपल्या मुलीला निरोप दिला.