'मोदी है तो मुमकिन है', अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोदींवर स्तुतिसुमनं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 09:25 AM2019-06-13T09:25:27+5:302019-06-13T09:25:42+5:30
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत.
वॉशिंग्टनः अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी भाजपाच्या निवडणुकीतील घोषणा 'मोदी है तो मुमकिन है' याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. पॉम्पिओ 24 जून रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. तत्पूर्वीच त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोम्पिओ बुधवारी झालेल्या भारत-अमेरिका व्यापार परिषदेच्या बैठकीत म्हणाले, मोदी दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध कशा प्रकारे मजबूत करणार आहेत हे मी पाहणार आहे. एस. जयशंकर हे माझे साथीदार आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मी आतुर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणुकीच्या अभियानात म्हटलं होतं की, मोदी है तौ मुमकिन है, तर मी जाणू इच्छितो, भारत आणि अमेरिकेमध्ये काय शक्य आहे. आता त्यांनी जनतेला दिलेली आश्वासनं आणि जगातल्या इतर देशांशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित करतात हे पाहायचं आहे. मला आशा आहे की, अमेरिकेबरोबरच द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मोदी प्रयत्नशील राहतील. भारत दौऱ्यात ट्रम्प प्रशासनाच्या महत्त्वांच्या मुद्द्यांवर बातचीत होणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून काही वाद आहेत. परंतु आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. दोन्ही देशांकडे हिंद-प्रशांत सागर आणि जगाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याची संधी आहे. पोम्पिओ भारताबरोबरच श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत.
संयुक्त राज्य अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोम्पिओ यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मोदींनी संरक्षण क्षेत्रात अमेरिकेला समर्थन दिलं आहे. पण जेव्हापासून ट्रम्प प्रशासनानं भारतावर व्हेनेझुएला आणि इराणकरून तेल खरेदी करण्यासाठी दबाव बनवला, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये व्यापारावरून तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प प्रशासनानंही भारताला जीएसपी यादीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.