अमेरिका-रशियात तणाव; 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: पुतिन
By sagar.sirsat | Published: July 31, 2017 06:56 AM2017-07-31T06:56:35+5:302017-08-01T07:10:51+5:30
रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे.
मॉस्को, दि. 31 - रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. रशियाच्या एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमेरिकेच्या राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितल्याचं वृत्त आहे. अमेरिकेकडून रशियावर अनेक निर्बंध घातल्यानंतर रशियाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
रोसिया-24 या न्यूज चॅनलला व्लादिमिर पुतिन यांनी रविवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत, ''अमेरिकी दुतावास आणि अन्य कार्यालयांमध्ये आतापर्यंत एक हजाराहून जास्त लोक काम करत होते आणि अजूनही करत आहेत. पण 755 जणांना रशियातील आपलं कामकाज थांबवावं लागेल'' असं पुतिन म्हणाले. या शिवाय ''अमेरिकेसोबतचे संबंध दिर्घकाळ सुधारणार नाहीत'' असंही ते म्हणाले. सप्टेंबरपर्यंत अमेरिकेने राजनैतिक अधिका-यांची संख्या कमी करून 455 इतकी करावी अशी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापुर्वी मागणी केली होती. रशियाचेही इतकेच राजनैतिक अधिकारी अमेरिकेत कार्यरत आहेत.
''आम्ही बरीच वाट पाहिली, परिस्थितीत सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण आता परिस्थितीत लवकर बदल होण्याची चिन्हं दिसत नाहीत'', असं म्हणत अमेरिकेसोबतचे संबंध दिर्घकाळ सुधारणार नाहीत असं रोसिया-24 सोबत बोलताना पुतिन म्हणाले.
अमेरिकेच्या सीनेटने गुरूवारी एका विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकात 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याचं, तसंच 2014 साली क्रीमियावर मिळवलेल्या ताब्याचा उल्लेख असून याच्या विरोधात रशियावर अनेक निर्बंध लावण्याचं विधेयकात म्हटलं आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनीही पराभवास अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा(एफबीआय), विकिलीक्स आणि रशीयाच्या हॅकर्सना जबाबदार धरलं होतं. न्यू यॉर्कमध्ये ‘वुमन फॉर वुमन इंटरनेशनल फोरम’ या कार्यक्रमात सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी जर 27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी तुमची राष्ट्रपती असती. पण असं झालं नाही. 28 ऑक्टोबरला एफबीआयचे संचालक जिम कॉमेचं पत्र आणि रशिया विकिलीक्सच्या मेलमुळे जे लोक मला मतदान करणार होते, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल या लोकांनी संशय निर्माण केला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मी 30 लाख मते जास्त घेतली होती. परंतु, नंतर इलेक्टोरेल मतदानात ट्रम्प विजयी झाले. प्रचारादरम्यान माझ्या वैयक्तिक इ-मेल्स हॅकिंगमागे रशियाची भूमिका आणि विकिलिक्सने एकामागोमाग माझ्याबाबतचे प्रकरणं सादर करण्याच्या वेळेत साधर्म्य असल्याबाबतही हिलरी यांनी शंका व्यक्त केली होती.