हात मोडून घेऊ; पण सैन्यात जाणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:08 AM2022-09-26T10:08:32+5:302022-09-26T10:08:55+5:30
“रशियात पुरुषांनी सैन्यात भरती होणं बंधनकारक आहे.” असं व्लादिमिर पुतीन यांनी गेल्या बुधवारी त्यांच्या भाषणात जाहीर केलं आणि संपूर्ण रशियात एकच खळबळ उडाली.
“रशियात पुरुषांनी सैन्यात भरती होणं बंधनकारक आहे.” असं व्लादिमिर पुतीन यांनी गेल्या बुधवारी त्यांच्या भाषणात जाहीर केलं आणि संपूर्ण रशियात एकच खळबळ उडाली. दुसऱ्या महायुद्धावेळी अशी सर्वांना बंधनकारक असलेली सैन्यभरती रशियाने केली होती. त्यानंतर आत्ता पहिल्यांदाच रशियाने त्यांच्या पुरुष नागरिकांना सैन्यात भरती होऊन युद्धावर दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
फेब्रुवारीमध्ये पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केलं, त्यावेळी आपण ते एका आठवड्यात सहज जिंकू, अशी त्यांची वल्गना होती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. युक्रेनने अत्यंत कडवा प्रतिकार केला आणि शरणागती पत्करायला नकार दिला. अजूनही सुरू असलेल्या त्या युद्धात रशियाची देखील अपरिमित हानी झालेली आहे. एवढंच नाही, तर रशियन सैन्याने कब्जा केलेली शहरं युक्रेनी सैन्य पुन्हा ताब्यात घेऊ लागलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून रशियन पुरुषांना त्यांच्या सैन्यातील कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
यातही ज्यांचं वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांनी काही काळ सैन्यात ज्युनिअर पदांवर कामं केलेली आहेत, अशांना वैयक्तिकरित्या नोटीस दिल्या जात आहेत. तर इतर अनेकांना फोन करून हजर होण्याचे आदेश दिले गेले आहेत. पूर्वी रशियन सैन्यात कर्तव्य बजावलेला एक मॉस्कोचा रहिवासी म्हणतो, “ते फेब्रुवारीपासून माझ्या मागे लागलेले आहेत. त्यांना पुन्हा माझ्याशी सैन्यात भरती होण्याचा करार करायचा आहे.”
मात्र, या बंधनकारक सैन्यभरतीने रशियन नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पुतीन यांच्या भाषणानंतर रशियामधून इंटरनेटवर सर्च केल्या गेलेल्या दोन बाबींमधून तेथील लोकांची मन:स्थिती लक्षात येते. देशभरातून पहिली शोधली गेलेली गोष्ट आहे ती अर्थातच, “रशियातून पळून शेजारी देशांमध्ये जाण्याचे मार्ग कोणते?” आणि दुसरी गोष्ट लोक शोधताहेत ती म्हणजे, “घरच्या घरी हात कसा मोडून घ्यायचा?”
युद्ध नको होतं...
या दुसऱ्या सर्चमधून लोकांच्या मनःस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हाड मोडणे ही माणसाला होऊ शकणाऱ्या सगळ्यात वेदनादायक दुखापतींपैकी एक आहे. पण आपला हात मोडला तर आपल्याला सैन्यात भरती होण्यापासून सुटका मिळेल, हे लोकांना माहिती आहे. सक्तीची सैन्यभरती टाळण्यासाठी लोक आपणहून ती भयंकर वेदना सहन करायला तयार आहेत. स्वतःची गाडी घेऊन देश सोडू पाहणाऱ्यांच्या बरोबरीने विमानाचं तिकीट काढून देश सोडू पाहणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. इतकी की, रशियातून बाहेरदेशी जाणाऱ्या विमानांची तिकिटं प्रचंड महाग आणि लगेचच मिळेनाशी झाली. मॉस्कोमध्ये राहणाऱ्या ॲना नावाच्या महिलेला दोन मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगा २४ वर्षांचा आहे. ती म्हणते, “असं काहीतरी होईल, याची भीती मला फेब्रुवारीपासून वाटते आहे. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. पण आता माझ्यासमोर दुसरा काहीही इलाज उरलेला नाही. मी माझ्या मुलांना या आठवड्यात आर्मेनियाला पाठवून देणार आहे. आम्ही का आमच्या मुलांना युद्धावर पाठवायचं? का त्यांचे जीव धोक्यात घालायचे? हे युद्ध करण्यामागचा उद्देश तरी काय आहे?आम्हाला हे युद्ध कधीच नको होतं.”
मॉस्कोमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका इंजिनिअरचं वय असं आहे की, त्याला केव्हाही रशियन सैन्यात भरती होण्याचा आदेश येऊ शकतो. त्याला अजूनपर्यंत असा आदेश आलेला नाही. पण तो म्हणतो, “आम्ही आमच्या कुटुंबाच्या इमिग्रेशनसाठीची तयारी तातडीने सुरू केलेली आहे. आम्हाला निदान ऑक्टोबरच्या सुरूवातीला तरी इथून बाहेर पडलं पाहिजे. त्यानंतर कदाचित फार उशीर होईल आणि मग देश सोडून जाताच येणार नाही. पण इथली कामं अजून बाकी आहेत आणि आत्ता उपलब्ध असलेल्या तिकिटांची किंमत १६,००० डॉलर्स (जवळजवळ १३ लाख रुपये) यापेक्षाही जास्त आहे. ती मला परवडणं शक्यच नाही.’’
ज्यांना शक्य आहे ते लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यांना ते शक्य नाही ते लोक स्वतःचा हात मोडून घेऊन का असेना, पण सैन्यात भरती होणं कसं टाळता येईल, याच्या विचारात आहेत. अशावेळी असा प्रश्न उपस्थित होतोच की, मग हे युद्ध कोणाला लढायचं आहे? आणि कशासाठी?
काहीही करा; पण देश सोडा!
फिनलँड आणि मंगोलिया या दोन्ही बॉर्डर्सवर रशिया सोडून जाऊ पाहणाऱ्या लोकांच्या गाड्यांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांना भीती वाटते आहे की, देश सोडून जाण्यावर जर बंधनं आली, तर काही दिवसांनी तेही करणं अशक्य होऊन बसेल.