"भारतासाठी आम्ही पाकिस्तानला...", रशियाच्या राजदूतांचं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 09:24 AM2023-02-09T09:24:33+5:302023-02-09T09:25:56+5:30
पाकिस्तानमुळे आपले भारतासोबतचं संबंध खराब करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही.
नवी दिल्ली-
पाकिस्तानमुळे आपले भारतासोबतचं संबंध खराब करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही. नवी दिल्लीतील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी भारत आणि पाकिस्तानसोबतच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं आहे. रशियानं भारतासाठी पाकिस्तानसोबतच्या संरक्षण संबंधांचा गळा घोटला आहे, असं मोठं विधान डेनिस अलीपोव यांनी केलं आहे. तसंच भारताचं नुकसान होईल असं कोणतंही पाऊल रशिया उचलणार नाही, असंही ते म्हणाले.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या विधानानंतर रशियन राजदूत डेनिस अलीपोव यांनी हे विधान केलं आहे. नियमित सैन्य कारवाईत रशिया पाकिस्तानचं समर्थन करत राहील, असं विधान सर्गेई लावरोव यांनी केलं होतं. याआधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो देखील रशियाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पाकिस्तान आणि रशियातील संरक्षण, व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं.
भारतासाठी तेलाचा पुरवठा सुरूच राहणार
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अलीपोव यांनी रशिया आणि भारतमधील तेलाच्या व्यापारावरही भाष्य केलं आहे. कच्च्या तेलावरील पाश्चिमात्य देशांकडून लावण्यात आलेल्या प्राइस कॅपनंतरही रशिया भारताला तेलाचा पुरवठा करत राहील, असं अलीपोव म्हणाले. तसंच सर्वच पातळीवरील निर्यात स्तर कायम राखला जाईल आणि भारतासोबतच्या संबंधांमध्ये आणखी दृढता आणण्याचा मानस असल्याचं रशियाकडून सांगण्यात आलं आहे.