युद्ध सुरू असतानाच थेट युक्रेनमध्ये धडकले पुतीन, जागतिक तणाव वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:06 AM2023-03-20T05:06:37+5:302023-03-20T08:02:48+5:30
या भेटीमुळे जागतिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मारियुपोल : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच युक्रेनमध्ये पोहोचले. रविवारी पुतीन यांनी रशियाच्या ताब्यातील मारियुपोल शहराला भेट दिली. ते हेलिकॉप्टरने येथे पोहोचले. त्यांनी येथे काही सामान्य लोकांचीही भेट घेतली. या भेटीमुळे जागतिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुतीन यांनी नेव्हस्की जिल्ह्यातील एका कुटुंबाच्या घरीही भेट दिली. पुतीन यांच्या दौऱ्यावर युक्रेनकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पुतीन यांनी युक्रेनमधील लष्करी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. पुतीन शनिवारी रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामध्ये पोहोचले होते. पुतीन यांची भेट अशा वेळी झाली आहे. जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रशियाला भेट देणार आहेत.
कारही चालविली
पुतीन यांनी डेप्युटी पीएम खुशुनिलीन यांच्यासोबत मारियुपोलच्या रस्त्यावर कारही चालवली. तेथील रस्त्यांचे वर्णन त्यांनी अप्रतिम केले.
खुशुनिलीन म्हणाले की, लोक आता मारियुपोलला परतायला लागले आहेत. मे २०२२ पासून मारियुपोल रशियाच्या ताब्यात आहे. येथे रशिया आणि युक्रेनमध्ये बरेच दिवस युद्ध झाले, नंतर रशियाला यात यश मिळाले. मारियुपोलमध्ये सुमारे ५ लाख लोक राहत होते. युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लँटही येथेच होता.