रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 01:29 PM2018-03-19T13:29:01+5:302018-03-19T13:29:01+5:30

२०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील.

Vladimir Putin wins Russia presidential election re-elected for another 6 years | रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष

रशियामध्ये पुन्हा पुतीनराज, जगातील सर्वात मोठ्या देशाचे अध्यक्ष

Next

मॉस्को- आकाराने जगात सर्वात मोठ्या असणाऱ्या देशाच्या प्रमुखपदाची धुरा व्लादिमिर पुतीन यांच्याकडे आली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीमध्ये पुतीन यांचा विजय झाला असून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडले गेले आहेत.
जवळजवळ २५ वर्षे रशियाची सत्ता सांभळण्याची संधी पुतीन यांना या निमित्ताने मिळाली आहे. २०२४ पर्यंत त्यांची ही नवी टर्म असेल. २०२४ साली ते ७१ वर्षांचे असतील. त्यांच्याआधी जोसेफ स्टॅलिनने रशियाची सत्ता सांभाळली आहे. निवडणुकीतील ७० टक्के मते मोजल्यानंतरच पुतीन विजयी झाल्याचे निश्चित झाले. पुतीन यांना ७५.९ टक्के मते मिळाल्याचे यातून स्पष्ट झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी घेतलेल्या निर्णयांवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे असा मी या निवडणुकीचा अर्थ लावतो असे रेड स्क्वेअर येथे मतमोजणीनंतर केलेल्या भाषणामध्ये पुतीन यांनी सांगितले.

पावशतकापेक्षा अधिक काळ सत्तेत राहाणाऱ्या नेत्यांमध्ये ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोनॉली राखमोन, कॅमेरुनचे पॉल बिय, इक्वेटोरियल गिनीचे तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचा समावेश आहे.

सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारे नेते
क्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.

तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.

उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.

लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.

गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.

अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.

झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळत होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली.
 

Web Title: Vladimir Putin wins Russia presidential election re-elected for another 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.