ज्वालामुखीचा उद्रेक
By admin | Published: September 29, 2014 05:56 AM2014-09-29T05:56:08+5:302014-09-29T05:56:08+5:30
माऊंट आॅन्टेक या डोंगराच्या माथ्यावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ३० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
टोकिओ : माऊंट आॅन्टेक या डोंगराच्या माथ्यावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ३० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. टोकिओ शहरापासून २०० किलो मीटर दूर असलेल्या या पठारावर तप्त राखेचे प्रचंड लोळ उठले असून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा डोंगर ढासळल्याने खालच्या दिशेने तप्त लाव्हा रस वाहत आहे. डोंगराच्या शिखरानजीकच्या भागात ३० जण बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची श्वसनक्रिया बंद होती. त्यांची ओळख पटली नाही. ज्वालामुखी सक्रिय झाला त्यावेळी या डोंगराच्या पायथ्याला २०० लोक अडकले होते. रविवारी रात्रीपर्यंत या ज्वालामुखीच्या तोंडातून त्यांची सुखरूपणे सुटका करण्यात यश आले.
शनिवारपासून या ठिकाणी ज्वालामुखी धगधगत आहे. सर्वत्र तप्त राखेचे लोळ उठले आहेत. तप्त राखेचे लोट वेगाने खाली वाहत असल्याने पायथ्यालगतच्या भागातील स्थिती गंभीर बनली आहे. रविवारपासून या भागात बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले असून हेलिकॉप्टरच्या मदतीने तेथे अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे इतरत्र हलविण्यात येत आहे. जीव वाचविण्याच्या धडपडीत ४० जण जखमी झाले असून अनेकांची हाडे मोडली आहेत. ४५ जणांचा ठाव लागत नाही. प्रशासन त्यांचा शोध घेत आहे, असे अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.
जपानमध्ये अधूनमधून ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. कारण जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देश आहे. त्यामुळे भूगर्भीय हालचालीवर सातत्याने लक्ष दिले जाते, तसेच ज्वालामुखी सक्रिय होत असल्याचे संकेत मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वेळीच सावधानतेचा इशारा देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात येते. १९९१ पासून ज्वालामुखी उद्रेकात एकाचा मृत्यू झालेला नाही. (वृत्तसंस्था)