मानवी वस्त्यांमध्ये शिरला लाव्हारस व राख, हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:39 AM2018-05-05T02:39:51+5:302018-05-05T02:39:51+5:30
अमेरिकेतील हवाई बेटाच्या काही भागात बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तेथील किलौई ज्वालामुखीचा गुरुवारी उद्रेक होऊन त्यातील लाव्हारस व राख तेथून जवळच्याच नागरी वस्त्यांत जाऊन पडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.
होनोलूलू - अमेरिकेतील हवाई बेटाच्या काही भागात बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तेथील किलौई ज्वालामुखीचा गुरुवारी उद्रेक होऊन त्यातील लाव्हारस व राख तेथून जवळच्याच नागरी वस्त्यांत जाऊन पडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित
ठिकाणी निघून जाण्यास सांगण्यात आले आहे.
पहोआ शहराच्या परिसरात असलेल्या लैलानी इस्टेस्ट भागाजवळ किलौई ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नागरी वस्तीमधील रस्त्यावरही मोठी भेग पडली असून त्यातून तसेच या परिसरातील जंगलातूनही लाव्हारस वाहत असल्याची दृश्ये स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहेत.
किलौई ज्वालामुखीच्या मुखातून लाव्हारसाचे कारंजे सुमारे १५० फुटांपर्यंत उंच उडत आहे. हा लाव्हारस लैलानी इस्टेटमधील एका घराच्या मागून वाहताना दिसल्याचे एका रहिवाशाने सांगितले. ज्वालामुखीच्या तोंडातून लाव्हारस बाहेर येताना होणारा आवाज जेट विमानाच्या इंजिनासारखा आहे. लैलानी इस्टेट्स भागात सुमारे दीड हजार लोक राहतात. (वृत्तसंस्था)
१९२४ सालीही झाला होता उद्रेक
होनोलुलूच्या पुना भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळेच ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा असे भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. याआधी १९२४ साली किलौई ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यावेळी ज्वालामुखीच्या तोंडातून सुमारे १० टन राख, लाव्हारस, दगड बाहेर फेकले गेले होते.