या देशात फुटला महागाईचा ज्वालामुखी, महागाई दर १००टक्क्यांजवळ, तर व्याजदर ७५ टक्क्यांवर, महिनाभरात बदलले तीन वित्तमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:14 PM2022-09-16T13:14:55+5:302022-09-16T13:15:32+5:30
Inflation In Argentina: गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मात्र जशी अवस्था अर्जेंटिनाची झाली आहे. तशी क्वचितच कुठल्या देशाची झाली असेल
ब्युनॉस आयर्स - गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मात्र जशी अवस्था अर्जेंटिनाची झाली आहे. तशी क्वचितच कुठल्या देशाची झाली असेल. येथे महागाईने लोकांचं जगणं कठीण करून टाकलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येथील महागाई दर वाढून ७९ टक्के झाला आहे. तर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने व्याजदरांमध्ये ५.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशातील व्याजदर ७५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. देशातील केंद्रीय बँकेने यावर्षी नवव्यांदा व्याजदरात कपात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार वाढत्या महागाईमुळे त्रस्त जनता सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. अर्थशास्त्रज्ञांनी अर्जेंटिनामध्ये महागाई दर हा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. तर केंद्रीय बँकेच्या संचालक मंडळाने पुढच्या वर्षी सेंट्रल बँकेकडून ठेवण्यात आलेल्या अल्पकालीन कर्जाच्या स्तराला कमी करण्यावरही विचार करण्यात येत असल्याचे सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही पुढे आली आहे.
अर्जेंटिनाच्या सेंट्रल बँकेचे अध्यक्ष मिगुएल पेस आणि अर्थमंत्री सर्जियो मस्सा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ४४ दशलक्ष डॉलर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठी अर्जेंटिनाला आपले व्याजदर महगाई दरापेक्षा अधिक ठेवावे लागतील.
त्यासाठी आता अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने व्याजदरामध्ये ५.५ टक्क्यांनी वाढवून ७५ टक्के केले होते. मात्र अजूनही हा व्याजदर महागाई दरापेक्षा कमी आहे. दरम्यान, वारेमाप महागाई वाढत असल्याने आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यात अपयश आल्याने गेल्या काही काळात अर्जेंटिनामध्ये तीन अर्थमंत्री बदलले आहेत.