रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना २०३६पर्यंत पदावर कायम राखण्याची संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:39 AM2020-06-26T02:39:05+5:302020-06-26T07:02:13+5:30
मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना २०३६ पर्यंत पदावर कायम राखण्याची संधी देण्यासंबंधीच्या घटनादुरुस्तीवर आठवडाभर चालणाऱ्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. २२ एप्रिल रोजीच हे मतदान घेण्यात येणार होते; परंतु कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ते पुढे ढकलण्यात आले. मतदानाची तारीख १ जुलै ही जाहीर करण्यात आली; परंतु मतदान केंद्रे एक आठवडाआधीच उघडण्यात आली. मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियावर दोन दशकांपासून शासन करणाºया ६७ वर्षीय पुतीन यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये समाप्त होणार आहे; परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रशियामध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ ६ वर्षांचा आहे.
घटनादुरुस्तीच्या इतर प्रस्तावांमध्ये सामाजिक लाभ, स्त्री-पुरुष विवाहाची परिभाषा निश्चित करणे व सरकारमधील शक्तीचे वाटप आदी निर्णयांचा समावेश आहे.
या घटनादुरुस्तींना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेली आहे व पुतीन यांच्या स्वाक्षरीनंतर त्याबाबतचे कायदेही तयार करण्यात आले आहेत. वादग्रस्त घटनादुरुस्तींवर मतदान घेऊन त्याला लोकशाही पद्धतीची मान्यता देण्याचा हा प्रयत्न आहे.