'त्याने' २५ अब्ज किलोमीटरवरून केला संपर्क; ‘नासा’सह विज्ञान क्षेत्रात आनंदाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 06:19 AM2024-04-25T06:19:59+5:302024-04-25T06:20:29+5:30
अंतराळयान व्हॉयजर-१ पाच महिन्यांनी पुन्हा सक्रिय, अंतराळात सर्वांत दूर गेलेले हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे.
न्यूयॉर्क : पाच महिन्यांच्या खंडानंतर व्हॉयजर-१ हे अंतराळयान पुन्हा सक्रिय करण्यात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) यश आले आहे. प्रदीर्घ काळानंतर जेव्हा या यानाने विश्वातील २५ अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला संदेश पाठवला, तेव्हा नासासह विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंदाची लाट उसळली.
सुमारे पाच महिन्यांच्या खंडानंतर नासाला व्हॉयजर-१ या अंतराळयानाकडून संदेश मिळाला आहे. विश्वात २५ अब्ज किलोमीटर दूर फिरणाऱ्या या यानाने १४ नोव्हेंबर २०२३ नंतर संदेश पाठवणे बंद केले होते. अंतराळात सर्वांत दूर गेलेले हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे.
एलियन्ससाठी ‘गोल्डन रेकॉर्ड’
अंतराळात पाठवलेल्या संदेशांना ‘गोल्डन रेकॉर्ड’ म्हणतात. सोन्याचा मुलामा असलेल्या १२-इंच तांब्याच्या डिस्कवर एलियन्ससाठी संदेश रेकॉर्ड केला जातो. गोल्डन रेकॉर्डमध्ये सौर यंत्रणेच्या नकाशासह युरेनियमचा तुकडादेखील आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की, युरेनियमचे वय एलियन्सला हे यान केव्हा प्रक्षेपित करण्यात आले हे शोधण्यास मदत करेल. डिस्क सुरू करण्यासाठी निर्देशदेखील आहेत.
२०१२ मध्ये स्टार्सपर्यंत पोहोचले
१९७७ मध्ये व्हॉयेजर-१ लाँच करण्यात आले. २०१२ मध्ये याने आंतरतारकीय माध्यमात (सौरमंडळाबाहेरील ताऱ्यांच्या विश्वात) प्रवेश केला. असे करणारे ते पहिले अंतराळयान होते. पृथ्वीवरून पाठवलेले संदेश तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २२.५ तास लागतात. नासाने २०१८ मध्ये व्हॉयेजर-२ नावाचे त्यांचे दुहेरी अंतराळ यान देखील प्रक्षेपित केले. दोन्ही यानांत अंतराळातील संभाव्य एलियनसाठी संदेश वाहून नेलेले, असण्याची शक्यता आहे.
चिपमध्ये होती समस्या...
व्हॉयेजरच्या शांततेमागे चिपमधील त्रुटी जबाबदार होती. तज्ज्ञांनी ४६ वर्षे जुन्या संगणक प्रणालीची ही चिप नवीन कोडसह दुरुस्त केली. नासाच्या म्हणण्यानुसार व्हॉयेजरकडून आता अंतराळयान वाचता येईल, असे संदेश पाठवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला डेटा पाठविण्यास सक्षम बनवणे ही पुढील पायरी असेल. व्हॉयेजर-१ ची बॅटरी २०२५ नंतर संपू शकते, याचा अंदाज आहे. त्यानंतरही तो आकाशगंगेत फिरत राहील.