जीवलग ‘मित्रा’ची भुतानला प्रतीक्षा

By admin | Published: June 15, 2014 02:08 AM2014-06-15T02:08:34+5:302014-06-15T02:08:34+5:30

पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या परदेशभेटीसाठी भुतानची निवड करून दक्षिण आशियाई राजकारणातल्या बदलाचे संकेत देणारे नरेंद्र मोदी आज थिम्पू येथे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालतील

Waiting for a ghost friend | जीवलग ‘मित्रा’ची भुतानला प्रतीक्षा

जीवलग ‘मित्रा’ची भुतानला प्रतीक्षा

Next

अपर्णा वेलणकर, थिम्पू
भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या परदेशभेटीसाठी भुतानची निवड करून दक्षिण आशियाई राजकारणातल्या बदलाचे संकेत देणारे नरेंद्र मोदी आज थिम्पू येथे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालतील. एरव्हीचे पश्चिमधार्जिणे प्राधान्य बदलून शेजारी भारताच्या पंतप्रधानांनी सीमेपल्याडच्या आपल्या छोट्या मित्राच्या भेटीसाठी प्रथम यावे, याबद्दल भुतानमध्ये आश्चर्यमिश्रित स्वागताची भावना आहे.
थिम्पूच्या दक्षिणेला वांगचू नदीच्या किनाऱ्यावरल्या ताशी झाँग नावाच्या भव्य पुरातन वास्तूमध्ये भुतानचे पंतप्रधान ल्योंचेन टोग्बे नरेंद्र मोदींचे स्वागत करतील. त्यानंतर, भुतानच्या राजानेही मोदींना खास भेटीसाठी निमंत्रित केले आहे.
भारताला भुतानकडून विजेचा अखंड पुरवठा हवा आहे आणि विजेच्या निर्यातीतून मिळणारी भारतीय चलनाची गंगाजळी भुतानच्या डगमगत्या अर्थव्यवस्थेसाठी श्वासाहून महत्त्वाची आहे. याखेरीज, दोन देशांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची उभारणी, डोंगराळ भागातील रस्तेबांधणीसाठीचे आधुनिक तंत्रज्ञान, इतर पायाभूत सुविधांची निर्मिती, व्यापार आणि गुंतवणूक हे कळीचे विषय दोन्ही देशांच्या कार्यक्रम पत्रिकेवर असतील. पर्यटक म्हणून फिरताना दिसणारे या हिरव्यागर्द देशाचे रूप जितके विलोभनीय आहे, तितकाच या देशाचा सामाजिक धागा गुंतागुंतीचा! एरव्ही, परदेशी भूमीवर आपल्या कवडीमोल रुपयामुळे खिसे हलके होण्याचा अनुभव असलेले भारतीय पर्यटक इथल्या दुकानदारांना असलेले भारतीय रुपयाचे अप्रूप पाहूनच खूश होतात. चहा-साखरेपासून थेट पेट्रोलपर्यंतच्या जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तू भारतातून येतात आणि देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पात भारतीय रुपयाच्या गंगाजळीत किती वाढ-घट झाली, याची चर्चा महत्त्वाची असते.
भुतानमध्ये वापरले जाणारे जवळपास १०० टक्के पेट्रोल आणि डिझेल भारतातून निर्यात होते. या इंधनावरची सबसिडी अचानक रद्द करून संपुआ सरकारने गेल्याच वर्षी भुतानी अर्थव्यवस्थेचे प्राण कंठाशी आणले होते. काही महिन्यांतच मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय मागे घेतला, पण दोन्ही देशांच्या परस्पर संबंधात या घटनेने कटुता आणली होती. नव्या राजवटीत भारताच्या नेतृत्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या ‘कडव्या नॅशनॅलिस्ट’ नेत्याच्या हाती गेल्यावर भुतानमध्ये शंकेचे मळभ दाट झाले होते, परंतु शपथविधी समारंभासाठी शेजारी राष्ट्रांना सन्मानाने आमंत्रित करण्याच्या ‘मास्टरस्ट्रोक’मुळे हे ढग दूर झाले.
नरेंद्र मोदींच्या आजच्या भेटीतून भुतानला हवा आहे तो परस्पर संबंधांच्या सुरळीततेचा दिलासा आणि देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीचे आश्वासन!

Web Title: Waiting for a ghost friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.