स्वत:ची किमान १०५ मुलं तरी हवीतच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:57 AM2021-08-09T08:57:00+5:302021-08-09T08:58:18+5:30

ख्रिस्तिनाला आताच ११ मुलं असली तरी त्यातील सर्वात मोठी मुलगी विका हीच केवळ नैसर्गिकरीत्या जन्माला आलेली आहे. बाकीची दहा मुलं सरोगसी पद्धतीनं जन्माला आली आहेत. 

Wants 105 children says Christina a mother of 11 children at the age of 23 | स्वत:ची किमान १०५ मुलं तरी हवीतच!

स्वत:ची किमान १०५ मुलं तरी हवीतच!

Next

महाभारतात गांधारीला १०५ पुत्र होते, अर्थात कौरव! पण आपल्याला खरोखरच १०५ मुलं असावीत असं एखाद्या महिलेचं स्वप्न असलं तर?? आणि त्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करीत असेल तर?? अर्थातच जैविकदृष्ट्या ते शक्य नाही; पण रशियाची एक महिला आहे, तिचं स्वप्न आहे, आपल्याला किमान १०५ मुलं असावीत! 

रशियातील या महिलेचं नाव आहे ख्रिस्तिना ओझस्ट्रक. २३ वर्षांच्या या महिलेला आत्ताच ११ मुलं आहेत. तिचा पती गालीप ओझस्ट्रक आहे ५६ वर्षांचा! हे जोडपं रशियातील अब्जाधीश जोडपं आहे, त्यामुळे मुलांना वाढवायचं कसं, त्यांच्या शिक्षणाचं, पालनपोषणाचं काय, हा प्रश्न त्यांना नाही. दोघांनाही मुलांची प्रचंड आवड आहे. गालीप म्हणतात, मुलांच्या सहवासात आम्ही देहभान विसरतो. त्यांच्या सोबत असलो की जगातली कुठलीही चिंता आमचं काळीज कुरतडू शकत नाही.

ख्रिस्तिनाला आताच ११ मुलं असली तरी त्यातील सर्वात मोठी मुलगी विका हीच केवळ नैसर्गिकरीत्या जन्माला आलेली आहे. बाकीची दहा मुलं सरोगसी पद्धतीनं जन्माला आली आहेत. 

अनेकांची कुठली ना कुठली स्वप्नं असतात. त्या स्वप्नांसाठी ते जीवतोड मेहनत करीत असतात. या जोडप्याचं स्वप्न आहे, ते मुलांचं. हे जोडपं सांगतं, आपल्याला १०५ मुलं व्हावीत, हे आमचं केवळ स्वप्न नाही, आम्हाला त्याची आस  आहे. या स्वप्नाचं रूपांतर जणू ‘ॲडिक्शन’मध्ये झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत हे स्वप्न आम्ही सत्यात उतरवू. 

हे गर्भश्रीमंत दांपत्य सध्या जॉर्जियातील बाटुमा येथे राहतं. ख्रिस्तिना म्हणते, लहानपणापासूनच मला मुलांची खूप आवड होती. लग्न झाल्यावर आपल्याही घरात खूप मुलं असावीत असं मला फार वाटायचं. सुदैवानं माझा पतीही त्याच विचारांचा निघाला. आम्हाला नैसर्गिकरीत्या किती मुलं होतील, हे माहीत नाही; पण किमान ११ मुलांच्या आत थांबण्याचा आमचा विचार नाही. आम्हाला इतिहास घडवायचा आहे. अर्थातच केवळ इतिहास घडवायचा म्हणून आम्हाला मुलं नको आहेत, मुलांवर आमचं खरोखर जिवापाड प्रेम आहे, आपली स्वत:ची खूप सारी मुलं असावीत, त्यांच्या आणि आमच्याही आनंदासाठी आम्हाला मुलं हवी आहेत. सुदैवानं त्यांच्या पालनपोेषणासाठी लागणाऱ्या सुविधा आणि पैशांची आमच्याकडे काहीच कमतरता नाही, मग आमचं स्वप्न आम्ही का म्हणून मारायचं? इतकी मुलं असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निदान आमच्याबाबतीत तरी शक्य नाही. प्रत्येक आईबापाची इच्छा असते, आपल्या मुलांना सर्वोत्तम ते ते सारं मिळावं, त्याचबरोबर एक उत्तम नागरिक म्हणूनही ते वाढावेत. आमची मुलंही तशीच वाढतील.. मुलं जन्माला घालण्यासाठी अर्थातच तंत्रज्ञानाचाही आम्हाला सहारा घ्यावा लागेल आणि आम्ही तो निश्चितच घेऊ! 

हे दांपत्य आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओज सातत्यानं सोशल मीडियावर अपलोड करीत असतात. नेटकऱ्यांचाही त्यांना भरपूर पाठिंबा मिळतो. आपल्या कुठल्याही अपत्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी हे दांपत्य घेतं. प्रत्येक बाळाची किमान दहा तास तरी झोप होईल याकडे ख्रिस्तिनाचं काटेकोर लक्ष असतं. रात्री आठ ते सकाळी सहा ही मुलांच्या झाेपेची सर्वांत महत्त्वाची वेळ असते, त्यामुळे त्यावेळी तरी ती झोपलेली असतील याकडे या दांपत्याचा कटाक्ष असतो. प्रत्येक बाळाचं, त्यांना दिलेल्या लसींचं व्यवस्थित रेकॉर्डही त्यांनी ठेवलं आहे. त्यासाठी एक डायरीच त्यांनी केली आहे. त्यात बाळांच्या वाढीपासून ते त्यांचं वजन, उंची, दुखणी, सवयी, आजार.. याची बारीकसारीक नोंद त्यांनी ठेवली आहे. त्यांचं सर्वांत अलीकडचं बाळ आहे, ते म्हणजे त्यांची मुलगी ऑलिव्हिया. १६ जानेवारी २०२१ला तिचा जन्म झालाय. मुलांना जन्म देण्यासाठी जे कुठले वैध आणि न्याय्य प्रकार आहेत, त्या सर्व मार्गांचा वापर करण्याची या दांपत्याची तयारी आहे. त्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तरी त्यांची ना नाही. एवढा पैसा आम्ही कमावलाय, तो आमच्या मुलांसाठी खर्च नाही करणार तर आणखी कोणावर, असंही हसून ते विचारतात. 

जगात अनेक देशांत बहुतेक दांपत्यांचा कल एक किंवा जास्तीत जास्त दोन अपत्यांकडे असताना, या दांपत्याला किमान १०५ मुलं हवीत म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेक अनुभवी पालकांनी त्यांना सबुरीचा सल्ला देताना, मुलांना कसं वाढवावं, याच्या टिप्सही पाठवायला सुरुवात केली आहे. विशेषत: मुलं का रडताहेत हे कळत नाही तेव्हा काय करायचं, याचे अनेक अनमोल सल्ले अनेकांनी  ओझस्ट्रक दांपत्याला दिले आहेत. 

मुलं किमान दत्तक तरी घ्या! 
आपला परिवार मोठ्यात मोठा असावा, या दृष्टीनं दोन्ही नवरा-बायकोचं प्रचंड एकमत आहे. केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर माध्यमांनाही त्यांनी याबाबत मुलाखती दिल्या आहेत. आमच्यासारखं तुम्हालाही मुलांना जन्म देणं शक्य नसेल, तर किमान अनाथ मुलं तरी दत्तक घ्या, असं त्यांचं कळकळीचं सांगणं आहे.

Web Title: Wants 105 children says Christina a mother of 11 children at the age of 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.