आर्मिनिया-अजरबैजानमध्ये युद्ध, दोन्ही बाजूंची मोठी जीवितहानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:16 AM2020-10-03T01:16:19+5:302020-10-03T01:17:11+5:30
दोन्ही बाजूंची मोठी जीवितहानी; पाच दिवसांनंतरही तिढा सुटेना
येरेवान/ बाकू : मध्य आशियातील दोन देशात युद्ध भडकले आहे. आर्मीनिया आणि अजरबैजान यांच्यात वादग्रस्त नागोर्नो- काराबाखवरुन सलग पाचव्या दिवशी रक्तरंजित लढाई सुरु आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांवर भीषण हल्ले करीत आहेत.आर्मिनियाने दावा केला आहे की, त्यांनी अजरबैजानचे ४ किलर ड्रोन आणि सैन्य विमान पाडले आहेत. यापूर्वी, आर्मीनियाने दावा केला होता की, त्यांचे एक सुखोई विमान तुर्कीच्या एफ- १६ ने नष्ट केले आहे. आर्मीनियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमने अजरबैजानचे एक विमान आणि एक ड्रोन विमान वादग्रस्त नागोर्नो- काराबाख भागात पाडले. या भागात रात्रभर बॉम्बचे आवाज येत होते.
अजरबैजानने आरोप केला आहे की, आर्मीनियाच्या सैन्याने टेर्टर शहरात सामान्य नागरिकांवर हल्ले केले आहेत. एका रेल्वे स्टेशनवर मोठे नुकसान केले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मारले गेले आहेत. तुर्कीचे अजरबैजानसोबत चांगले संबंध आहेत. तर रशियाचे आर्मीनियासोबत चांगले संबंध आहेत. या लढाईत आतापर्यंत १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. ही लढाई अशीच सुरु राहिली तर रशिया आणि तुर्कीसारखे देश यात उडी घेऊ शकतात. या गोळीबारात फ्रान्सचे दोन पत्रकार जखमी झाल्याचे वृत्त आहे. या लढाईत २७०० हून अधिक सैनिक एक तर जखमी झाले आहेत किंवा मृत्युमुखी पडले आहेत.