'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 02:32 PM2022-08-21T14:32:54+5:302022-08-21T14:33:05+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे.
इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. "काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पर्याय नाही. आम्हाला भारतासोबत चर्चेद्वारे शांतता कायम ठेवायची आहे,'' असे वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी केली आहे. पीएम शरीफ शुक्रवारी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते.
पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पाकिस्तान सीमा भागात शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला भारतासोबत असलेला सीमा वाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे. आम्हाला शाश्वत शांतता हवी आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येसाठी योग्य पर्याय नाही. पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे.''
5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्या, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. या निर्णयामुळे भारत-पाक संबंध आणखी बिघडले. काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांपासून ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे.