युद्धकैदी मीर अलीला लवकरच होणार फाशी
By admin | Published: September 1, 2016 04:22 AM2016-09-01T04:22:56+5:302016-09-01T04:22:56+5:30
बांगलादेशमधील १९७१ च्या युद्ध गुन्ह्यांचा दोषी आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामशी संबंधित उद्योगपती मीर कासिम अलीला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे.
ढाका : बांगलादेशमधील १९७१ च्या युद्ध गुन्ह्यांचा दोषी आणि कट्टरपंथी जमात-ए-इस्लामशी संबंधित उद्योगपती मीर कासिम अलीला फाशी देण्याची तयारी सुरू झाली आहे. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मीर कासिम अलीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच ६४ वर्षीय अलीची पुनरावलोकन याचिका फेटाळली होती. कासिमपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक प्रशांत कुमार बानिक यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला निर्णयाची माहिती मिळाली आहे, तर अलीसमोर ही प्रत सकाळीच वाचण्यात आली.
अली पाकिस्तानचा समर्थन करणाऱ्या कुख्यात ‘अल-बदर मिलिशिया’चा तिसरा प्रमुख व्यक्ती आहे. त्याच्यापूर्वीच्या दोन प्रमुख व्यक्ती ‘जमात-ए-इस्लामी’चा प्रमुख मोती उर रहमान निजामी आणि महासचिव अली अहसन मुहम्मद मुजाहिद यांना मृत्युदंड देण्यात आला आहे. अलीला १९७१ च्या मुक्तिसंग्रामात मानवतेविरुद्ध गुन्हा करण्याबद्दल दोषी ठरविले आहे. दरम्यान, अॅटर्नी जनरल महबुबे आलम यांनी सांगितले की, अली राष्ट्रपतींकडे क्षमायाचना करू शकतो. आता त्याच्याकडे एकमेव पर्याय आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अलीने राष्ट्रपतींकडे क्षमायाचना करण्यासाठी वेळ मागितला आहे. (वृत्तसंस्था)
मीर कासिम अलीला फाशी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अलीने अमेरिकेची लॉबी कंपनी कॅसिडी अॅण्ड असोसिएटस्बरोबर २.५ कोटी डॉलरचा सौदा केला होता. या माध्यमातून आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यासाठी अमेरिका आणि बांगलादेश सरकारला एकजूट केले जावे, हा उद्देश होता. १९७१ मध्ये जमातची तत्कालीन विद्यार्थी संघटना इस्लामी छात्र संघाचा युवा नेता राहिलेला अलीने स्वातंत्र्य मागणाऱ्या निर्दोष लोकांना त्रास दिला आणि जनतेत दहशत निर्माण केली.
बांगलादेशचे दोन अतिरेकी लपले भारतात?
बांगलादेशमधील अतिरेकी संघटना जमात- उल- मुजाहिदीनचे दोन अतिरेकी भारतात लपले असल्याचा संशय बांगलादेशने व्यक्त केला आहे. याबाबतच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की, ढाक्यातील कॅफेत १ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यासाठी हत्यारे आणि आर्थिक मदतीसाठी हे दोन अतिरेकी भारतात गेले होते. या दोन अतिरेक्यांपैकी एक शरीफुल इस्लाम खालीदवर एका प्रोफेसरच्या हत्येचा आरोप आहे.