युद्ध की लक्षावधी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:53 AM2023-05-22T07:53:36+5:302023-05-22T07:53:45+5:30

फक्त दुसऱ्या महायुद्धाचंच उदाहरण घेतलं, तर काय चित्रं दिसतं? या काळात किती महिलांवर अत्याचार झाले असावेत? हिटलरच्या नाझी सैनिकांच्या आतंकवादामुळं दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं.

War or the shame of millions of women? | युद्ध की लक्षावधी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे?

युद्ध की लक्षावधी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे?

googlenewsNext

‘जो जिता वही सिंकदर’ हा जगाचा नियम आहे. जेव्हा कोणत्याही दोन देशांमध्ये युद्ध पेटतं, एक देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो, एका देशाची सेना दुसऱ्या देशावर विजय मिळवते तेव्हा तर जेत्यांच्या आनंदाला फारच भरती येते. इतिहास सांगतो, विजयाचा हा आनंद, विजयाचा हा उन्माद बहुतांश वेळा क्रुरतेनं आणि मानवतेला काळिमा फासेल अशाच पद्धतीनं साजरा केला गेला आहे. जेत्यांनी किंवा ज्यांनी दुसऱ्याच्या भूभागावर, दुसऱ्याच्या राज्यावर, दुसऱ्या देशावर आक्रमण केलं, त्या- त्या वेळी तिथल्या जनतेचा अनन्वित छळ केला; पण प्रत्येक वेळी सर्वाधिक छळाला सामोरं जावं लागलं ते स्त्रियांनाच. विजयाच्या आणि आक्रमणाच्या या उन्मादात सैनिकांनी स्त्रियांवर पाशवी अत्याचार केले. त्यांना आपल्या वासनेची शिकार तर बनवलंच; पण शस्त्रं आणि जिवाच्या धाकावर त्यांना अक्षरश: वेश्याव्यवसायालाही लावलं. खास सैनिकांसाठी वेश्यालयं (मिलिटरी ब्रॉथेल्स) उघडली गेली आणि त्यातून लाखो अनौरस मुलंही जन्माला आली.

फक्त दुसऱ्या महायुद्धाचंच उदाहरण घेतलं, तर काय चित्रं दिसतं? या काळात किती महिलांवर अत्याचार झाले असावेत? हिटलरच्या नाझी सैनिकांच्या आतंकवादामुळं दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. १९३९ मध्ये जर्मनीनं पोलंडवर आक्रमण केलं. ही या महायुद्धाची सुरुवात होती. त्यानंतर जग जवळपास दोन भागात वाटलं गेलं. सुरुवातीला तर जर्मनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना चांगलं यश मिळालं. त्यानंतर जर्मनीला कडवा प्रतिकार सहन करावा लागला आणि त्यांचं आक्रमण मोडून काढण्यात आलं. युद्धकाळात ज्या ज्या राष्ट्रांनी दुसऱ्या देशांवर चढाई केली, त्या त्या वेळी त्या त्या देशाच्या सैनिकांनी तेथील महिलांवर अत्याचार केले. १९४४ मध्ये सोव्हिएत रशियानं पहिल्यांदा जर्मनीच्या काही शहरांवर ताबा मिळवला. त्यानंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैनिकांनीही जर्मनीची काही शहरं पादाक्रांत केली. इतिहासकारांच्या मते या काळात रेड आर्मीच्या सैनिकांनी जर्मनीच्या सुमारे वीस लाख महिलांवर बलात्कार केला. इतिहासातील हा सर्वांत मोठा सामूहिक लैंगिक अत्याचार मानला जातो. यातून किती अनौरस मुलं जन्माला आली, त्याची तर गिणतीच नाही! 

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या भयानक अत्याचारांच्या काही घटनांची ही केवळ झलक; पण आश्चर्य आणि खेदाची बाब म्हणजे काही देशांनी तर स्वत:हूनच सैनिकांसाठी आपल्याच देशातील महिलांच्या अब्रूचा बळी दिला. सध्या चर्चा सुरू आहे ती दक्षिण कोरियानं ४० वर्षांपूर्वी केलेल्या एका मोठ्या चुकीची. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. तेव्हापासून दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाच्या आक्रमणाची भीती वाटत होती. त्यामुळं दक्षिण कोरियानं अमेरिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दक्षिण कोरियात अमेरिकन सैन्य तैनात करण्यात आलं. हे अमेरिकन सैन्य ज्या छावण्यांमध्ये राहत होतं, तिथं त्यांच्या ‘मनोरंजना’ची जबाबदारी जबरदस्तीनं अनेक दक्षिण कोरियन महिलांवर सोपविण्यात आली होती. त्यांना ‘कम्फर्ट वुमन’ असंही म्हटलं जायचं. या कामासाठी बहुतांश महिलांची फसवणूक करून किंवा त्यांचं अपहरण करून त्यांना अमेरिकन सैनिकांच्या छावण्यांमध्ये पाठवलं जायचं. हे सर्व काम दक्षिण कोरियन सरकार आणि त्यांचं सैन्य यांच्या निगराणीत केलं जायचं. अनेक वर्षं दक्षिण कोरियानं त्याचा इन्कारच केला; पण काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयानं ही घटना सत्य ठरवून ज्या महिलांवर अत्याचार झाले, त्या महिलांना ‘नुकसानभरपाई’ देण्याचे आदेश दिले आहेत. 

१९७० ते ८० च्या दशकात अमेरिकन सैनिकांसाठी बळजबरीनं ‘सेक्स वर्कर’ म्हणून काम करायला लावणाऱ्या या महिलांचं पुनर्वसन आता सरकारला करावं लागेल. ज्या कारणावरून आज दक्षिण कोरियावर टीका केली जात आहे, त्याच कारणावरून जपानलाही कित्येक वर्षं टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोरियाच्या भूभागावर जपानचा कब्जा होता. त्यावेळी जपानच्या सैनिकांनी लाखो कोरियन महिलांवर अत्याचार केले होते आणि सुमारे दीड लाख लोकांना बळजबरीनं जपानी कारखान्यांमध्ये ‘गुलामगिरी’ करण्यासाठी बाध्य करण्यात आलं होतं. निप्पॉन स्टील  आणि मित्सुबिशी या कंपन्यांनी त्याची नुकसानभरपाई करावी, असा आदेशही २०१८ मध्ये देण्यात आला होता.

युद्ध पुरुषांचे, ‘टार्गेट’ स्त्रिया! 
जगभरातल्या युद्धात मुख्यत: लढतात ते पुरुष सैनिक; पण या प्रत्येक युद्धात टार्गेट केलं जातं ते महिलांना! सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धातही रशियन सैनिकांनी हजारो युक्रेनियन महिलांवर लैंगिक अत्याचार केला. रशियन सैनिकांच्या पत्नींनीच आपल्या पतींना या अत्याचारासाठी प्रेरित केलं, करीत आहेत, असेही आरोप आहेत!

Web Title: War or the shame of millions of women?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :warयुद्ध