अझरबैजान-आर्मेनियामध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात; रशिया-अमेरिकेने केले शांततेचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 12:56 PM2023-09-20T12:56:52+5:302023-09-20T12:57:32+5:30
Azerbaijan Armenia War: मंगळवारी अजरबैजानने पुन्हा एकदा आर्मेनियाविरोधात युद्ध पुकारले आहे.
Azerbaijan Armenia War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. यातच आता अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्षही पेटला आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी आर्मेनियाच्या नियंत्रणाखालील नागोर्नो-काराबाख येथे आपले सैन्य पाठवले आहे. याला त्यांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन म्हटले आहे. आर्मेनियन सैन्य शरण येईपर्यंत मोहीम थांबणार नाही, असा इशारा अझरबैजानने दिला आहे.
अझरबैजान हल्ल्यात दोन नागरिक ठार
अझरबैजानी सैन्याने वादग्रस्त नागोर्नो-काराबाख प्रदेशातील आर्मेनियन स्थानांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आर्मेनियन अधिकार्यांनी दावा केला आहे की, राजधानीभोवती जोरदार गोळीबारात किमान दोन नागरिक ठार आणि 11 जखमी झाले आहेत. आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात अनेक वर्षांपासून तणाव आहे.
लष्करी हल्ल्यांमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या शस्त्रांचा वापर
अझरबैजान मंत्रालयाने सांगितले की, आर्मेनियाच्या सशस्त्र सेना आणि लष्कराविरूद्ध उच्च-तंत्रज्ञान शस्त्रे वापरली जात आहेत. केवळ कायदेशीर लष्करी स्थळांवरच हल्ले करण्यात आल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. नागोर्नो-काराबाख मानवाधिकार लोकपालने सांगितले की, अझरबैजानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात 2 नागरिक ठार आणि 23 जखमी झाले. अझरबैजानची ही लष्करी आक्रमणे थांबवण्यासाठी आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने नागोर्नो-काराबाखमध्ये तैनात असलेल्या रशियन शांती सेनेला हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
रशियाने शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान म्हणाले की, त्यांचे सैन्य लढाईत सामील नव्हते आणि सीमेवरील परिस्थिती 'स्थिर' आहे. रशियाने सांगितले की ते अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे आणि नागोर्नो-काराबाख संघर्ष सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंनी वाटाघाटी करण्याचे आवाहन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस हे सध्या सुरू असलेल्या हल्ल्याबाबत अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांशी बोलण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनने मंगळवारी काराबाखमधील लष्करी वाढीचा निषेध केला आणि अझरबैजानला सध्याच्या लष्करी हालचाली थांबविण्याचे आवाहन केले.
अमेरिकेचे शांततेचे आवाहन
द इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी अझरबैजानला लष्करी मोहीम तात्काळ समाप्त करण्याचे आवाहन केले.