युद्ध पुन्हा सुरू, गाझात इस्रायलचे भीषण हल्ले, ४५० ठार! हा हल्ला ओलिसांसाठी मृत्युदंड : हमास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:10 IST2025-03-19T08:09:36+5:302025-03-19T08:10:02+5:30
या हल्ल्यामुळे गाझा आणि इस्रायल यांच्यात १९ जानेवारीला झालेला दोन महिन्यांचा युद्धविराम करार तुटला आहे.

युद्ध पुन्हा सुरू, गाझात इस्रायलचे भीषण हल्ले, ४५० ठार! हा हल्ला ओलिसांसाठी मृत्युदंड : हमास
तेल अवीव : इस्रायलने मंगळवारी सकाळी पुन्हा गाझामध्ये भीषण हवाई हल्ले सुरू केले आहेत. सुमारे २४ तासांपासून सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४५० जणांचा बळी गेला आहे, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
या हल्ल्यामुळे गाझा आणि इस्रायल यांच्यात १९ जानेवारीला झालेला दोन महिन्यांचा युद्धविराम करार तुटला आहे. आम्ही हल्ल्याची योजना आखत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहेत, असे इस्रायलने म्हटले आहे. तर, युद्ध पुन्हा सुरू करण्याचा नेतन्याहूंचा निर्णय म्हणजे इस्रायली ओलिसांसाठी मृत्युदंड देण्यासारखे आहे, असे हमासने इशारा देताना म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर हमासच्या ताब्यात असलेल्या सुमारे दोन डझन इस्रायली ओलिसांच्या सुटकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने लोकांना पूर्व गाझा रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की युद्धविराम वाढवण्याच्या चर्चेत कोणतीही प्रगती झाली नसल्याने हल्ल्याचा आदेश देण्यात आला आहे. इस्रायल आता लष्करी शक्ती वाढवून हमासवर कारवाई करेल. अमेरिकेने या युद्धासाठी अमेरिकेने पुन्हा हमासला जबाबदार धरले. त्यांनी युद्ध निवडले, असे अमेरिकेने म्हटले.
वेदना...वेदना...वेदना
दक्षिणेकडील खान युनिस शहरात स्फोटांनंतर सर्वत्र धुराचे लोट दिसत होते. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते. येथे रुग्ण जमिनीवर पडून वेदनेने ओरडत होते. हाताला गंभीर दुखापत झाल्याने एक मुलगी वेदनेने ओरडत होती.
गाझामध्ये नरकाचे दरवाजे उघडतील : इस्रायल
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी ओलिसांची सुटका न केल्यास गाझामध्ये नरकाचे दरवाजे उघडतील, असा इशारा दिला आहे. यामुळे हल्ले वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.