दोन थेंबांसाठी थांबले युद्ध; महालसीकरणाला सुरुवात, ६.५० लाख बालकांना देणार पोलिओची लस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:45 AM2024-09-02T06:45:19+5:302024-09-02T06:46:46+5:30
Israel-Hamas war: इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले.
देईर अल बलाह (गाझा) : इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले.
युद्ध सुरू असताना गाझामध्ये एका दहा महिन्यांच्या बालकाला पोलिओ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली. कारण गेल्या २५ वर्षांत प्रथमच या भागात पोलिओचा रुग्ण आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची गंभीर दखल घेत आणखी शेकडो मुलांना या विषाणूची बाधा झालेली असू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे युद्ध थांबवून गाझामधील सुमारे ६.५० लाख बालकांना तोंडावाटे देणारी पोलिओची लस दिली जाणार आहे.
... म्हणून जगाला चिंता
पोलिओग्रस्तांत प्रारंभी कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. पक्षघात होऊन अवयव निकामी झाल्यावरच पोलिओ झाल्याचे लक्षात येते.
■ पॅलेस्टाईनमध्ये युद्धकाळात बालकाच्या रूपाने एक रुग्ण आढळला असला, तरी अशा शेकडो मुलांना याची बाधा झालेली असू शकते, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरात आहे.