नवं संकट! आज सौर वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता; बत्ती गुल होणार, मोबाईल सिग्नल जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:14 PM2021-10-13T12:14:59+5:302021-10-13T12:18:17+5:30
वेगवान सौर वादळ आज पृथ्वीला धडकण्याची दाट शक्यता
सौर वादळ अतिशय वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत असल्याचा इशारा अमेरिकेतील वैज्ञानिकांनी दिला आहे. पुढील काही तासांत हे वादळ पृथ्वीला धडकू शकतं. त्याचा थेट परिणाम वीज पुरवठ्यावर होईल. वीज ग्रीड ठप्प होण्याचा धोका असल्यानं वीज पुरवठा खंडित होईल. मोबाईल सिग्नल आणि जीपीएसवरदेखील याचा प्रभाव दिसून येईल. अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पाहायला मिळतील.
पृथ्वीवर येणाऱ्या सौर वादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननं अलर्ट जारी केला आहे. भू-चुंबकीय वादळामुळे पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये वीज कोसळू शकते. यामुळे वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
उपग्रहांचं नुकसान होणार?
सौर वादळाचा सर्वाधिक परिणाम आज पाहायला मिळेल, असं अमेरिकन नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकन स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या दिशेनं सरकणारं सौर वादळ जी-२ श्रेणीत मोडतं. यामुळे अनेक उपग्रहांना फटका बसू शकतो.