कृषी कायदे: अमेरिकेत आंदोलनावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंडे फडकले
By कुणाल गवाणकर | Published: December 13, 2020 06:01 AM2020-12-13T06:01:16+5:302020-12-13T06:01:28+5:30
वॉशिंग्टन डीसीमध्ये कृषी कायद्यांविरोधात शीख समुदायाचं आंदोलन
वॉशिंग्टन: मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १५ दिवसांपासून हजारो शेतकरी रस्त्यावर आले आहेत. यामध्ये पंजाब, हरयाणातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. या आंदोलनाचं लोण आता परदेशांमध्येही पसरलं आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शीख समुदायातील अनेकांनी निदर्शनं केली. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. काहींनी गांधीच्या पुतळ्यावर रंग ओतला.
#WATCH | Washington DC: Khalistan flag draped over Mahatma Gandhi statue near the Indian embassy. Protesters were demonstrating against the Farm bills. pic.twitter.com/8G9ngHyAeZ
— ANI (@ANI) December 12, 2020
कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काही आंदोलकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले. त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर स्प्रे मारला. गांधींचा पुतळा खलिस्तानी झेंड्यांनी झाकला. ही घटना समोर येताच भारतीय दूतावासानं मेट्रोपॉलिटन आणि नॅशनल पार्क पोलिसांत तक्रार नोंदवली. या प्रकाराची माहिती परराष्ट्र विभागाला देण्यात आली. या घटनेबद्दल उपसचिव स्टीफन बीगन यांनी माफी मागितली आहे. बीगन यांच्या हस्तेच महिन्याभरापूर्वी गांधींच्या पुतळ्याचं दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आलं होतं.
The Embassy strongly condemns this mischievous act by hooligans masquerading as protesters against the universally respected icon of peace & justice: Indian Embassy in Washington DC, US https://t.co/UOfCPz821X
— ANI (@ANI) December 12, 2020
आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू; राहुल गांधींचा सरकारला सवाल
तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट करून मागील १७ दिवसांच्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ११ शेतकऱ्यांची छायाचित्रांसहित यादी दिली आहे. त्यांनी त्यावर भाष्य करताना म्हटले की, ‘कृषी कायदे हटविण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती आहुत्या द्याव्या लागतील?’
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत जोडलेल्या एका पत्रकवजा टिप्पणात म्हटले आहे की, ‘१७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर सरकार आणि शेतकरी यांच्यातील वाटाघाटींतून तोडगा निघण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. टिकरी आणि सिंघू सीमेवर ११ आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा बळी गेला आहे.
आंदोलन चिघळण्याची शक्यता
शेतीविषयक कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला १७ दिवस उलटून गेले तरी कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवार, दि. १४ डिसेंबरपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला असताना केंद्राने आंदोलनात माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केल्याने आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यातच केंद्र सरकारने कंत्राटी शेतीसंदर्भातील कायद्यात बदल करण्यास नकार दर्शविला आहे.
शेतकऱ्यांकडून चक्का जामची तयारी
आंदोलन तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे सर्व महामार्ग अडविण्याचे ठरवले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनासाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातून अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पोलीस दलाने उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनाचा फायदा घेऊन समाजविघातक शक्ती घातपात घडविण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांना हे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनावर ठाम असतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पुन्हा एकदा चर्चेचे आवाहन करीत कायद्यांत बदल मान्य असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आंदोलनामागे माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.