Suez Canal : सुएझ कालव्यात अडकलेलं जहाज मार्गस्थ करण्यास यश; जागतिक व्यापाराला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 11:23 AM2021-03-29T11:23:09+5:302021-03-29T11:25:20+5:30
Suez Canal Evergreen Ship : पाच दिवसांपासून अडकलेलं जहाज काढण्याचे सुरू होते प्रयत्न, पाहा जहाजाचा व्हिडीओ
युरोपशी सागरी मार्गाने जोडणारा आणि अत्यंत जलद मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या सुएझ कालव्यात मालवाहू जहाज अडकल्यानं या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक पाच दिवसांपासून ठप्प झाली होती. यामुळे या मार्गाने देशात येणारी सुमारे ३५० मालवाहू जहाजे अडकून पडली होती. परंतु या सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश मिळालं आहे. रॉयटर्सनं केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, यानंतर जागतिक मालवाहतुकीसाठी हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
सुएझ या अरुंद कालव्यातून दररोज ५० मालवाहू जहाजे मार्गस्थ होतात. २३ मार्चच्या सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी एव्हरग्रीन कंपनीचे ४०० मीटर लांबीचे अवजड जहाज या सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. त्यातच उठलेल्या वादळात हे जहाज तिरकंही झालं होतं. त्यातच दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गाळही साचलेला होता. यामुळे अडकून पडलेल्या मालवाहू जहाजाला गाळातून बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अडथळे दूर होऊन सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी पूर्ववत सुरू होईल. त्यासाठी केंद्र सरकारही याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली होती. दरम्यान, आता रविवारी सायंकाळी पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हे जहाज मार्गस्थ करण्यात आलं.
Stranded container ship blocking the Suez Canal was re-floated on Monday and is currently being secured, reports Reuters quoting Inch Cape Shipping Services
— ANI (@ANI) March 29, 2021
— Mhmdzaki (@mhmdzaki69) March 29, 2021
शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले होते, असी माहिती बर्नहार्ड शुल्ट जहाज कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिली होती. हे जहाज हलवण्यासाठी आतील बाजूला पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेच्या मदतीनं रविवारी हे दूर करण्याचा प्रयत्न झाला असून यात टग बोट्सचा वापरही करण्यात आला. या प्रयत्तांना अखेर यश मिळालं आहे.