Wang Yi Kabul Visit: मोठी बातमी! चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक अफगाणिस्तानला पोहोचले, तालिबानसोबत नेमकी कोणती चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:36 PM2022-03-24T17:36:23+5:302022-03-24T17:36:55+5:30
अफगाणिस्तानात तालिबान राजवट परत आल्यानंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर काबूलमध्ये पोहोचले आहेत.
काबुल-
अफगाणिस्तानाततालिबान राजवट परत आल्यानंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर काबूलमध्ये पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान चीनचे लक्ष अफगाणिस्तानमधील खाणकाम आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर असल्याचं मानलं जात आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी काबूलला अचानक भेट दिली. यापूर्वी, ते पाकिस्तानमध्ये उपस्थित होते ज्यात त्यांनी दोन दिवसीय ओआयसी (IOC) बैठकीत भाग घेतला होता. वांग यी गुरुवारी संध्याकाळी भारतातही येण्याची शक्यता आहे. तालिबानने गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर चीनची ही पहिलीच मोठी भेट आहे.
वांग यी यांनी तालिबानशी याआधीही चर्चा केली आहे. अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी मुल्ला अब्दुल गनी बरादार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची तियानजिनमध्ये भेट घेतली होती. भारतासह अनेक देशांनी अफगाणिस्तानमधील आपले दूतावास बंद केले आहेत, मात्र चीननं काबूलमधील आपलं दूतावास बंद केलेलं नाही. एवढंच नाही तर तालिबानला चिनी गुंतवणूकही मिळत आहे. असं असतानाही चीननं आतापर्यंत केवळ मर्यादित स्वरुपातच आर्थिक मदत अफगाणिस्तानला दिली आहे.
#Chinese Foreign Minister, Wang Yi is in Kabul to talk with the #Taliban officials on various issues, including political, economic and transit ties. pic.twitter.com/q5WNhrGTKL
— Ali Hussaini (@Ali_Hussaini86) March 24, 2022
चीनी कंपन्यांसाठी सुरक्षा मोठा मुद्दा
अफगाणिस्तानमधील खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी चीनच्या मेटलर्जिकल ग्रुप कॉर्पोरेशनशी बोलणी सुरू आहेत आणि मार्चच्या उत्तरार्धात चिनी टीम येईल, असं अफगाणिस्तानच्या खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयानं सांगितलं आहे. अफगाणिस्तानातील सुरक्षा परिस्थिती अजूनही चिनी कंपन्यांसाठी चिंतेचं प्रमुख कारण आहे. वांग यी यांच्या भेटीत या मुद्दय़ाचाही समावेश केला जाईल, असं मानलं जात आहे.
चीनमधून पाकिस्तानचा आणि पुढे अफगाणिस्तानात जोडला जाणार रस्ता
वांग यी याच आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यावरही होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी CPEC (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्याच्या योजनांबाबत चर्चा केली होती. चीन-अफगाणिस्तान-पाकिस्तान सहकार्य अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी केंद्राची भूमिका बजावू शकते, असं इम्रान खान यांच्या हवाल्यानं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तान सीपीईसीचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले.