मंगळावर पाणी!
By Admin | Published: September 29, 2015 02:42 AM2015-09-29T02:42:37+5:302015-09-29T03:35:10+5:30
मंगळावर खाऱ्या पाण्याच्या घळींच्या रेघोट्या आढळल्याने जगभरातील शास्त्रज्ञांना खुणावणाऱ्या मंगळ ग्रहावर पाणी असल्याच्या आशा बळावल्या आहेत.
पॅरिस: मंगळावर खाऱ्या पाण्याच्या घळींच्या रेघोट्या आढळल्याने जगभरातील शास्त्रज्ञांना खुणावणाऱ्या मंगळ ग्रहावर पाणी असल्याच्या आशा बळावल्या आहेत. नासाच्या एमआरओ यानावरील इमेजिंग स्पेक्टोमीटरचा वापर करून संशोधकांनी मंगळावरील टेकड्यांच्या उतारावर द्रवरुपी खनिजे शोधली.
मंगळाभोवती फिरणाऱ्या नासाच्या यानामार्फत मिळालेल्या डाटानुसार टेकड्यांवर आढळलेली ही लक्षणे मिठाशी संबंधित आहेत. पाणी गोठविण्यासह त्याचे बाष्पात रुपांतर करण्यासाठी लागणारे तापमानही हे मीठ बदलू शकते. त्यामुळे पाणी अधिक काळ प्रवाहित होऊ शकते.
या घळी शंभर मीटर लांबीच्या व पाच मीटर रूंद आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या पाण्यामुळे या घळी तयार झाल्या असाव्यात, असे मत खगोलशास्त्रज्ञांनी या आधीची व्यक्त केले होते. एप्रिलमध्येही शास्त्रांनी जर्नल नेचर जिओसायन्स या नियतकालिकात मिठाचा पाझर आढल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे लुजेंद्र ओझा यांनीही या छायाचित्रावरून मंगळावर पाणी असल्याची सैद्धांतिक शक्यता व्यक्त केली आहे. आोझा हे अटलांटातील जॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलीजीतून पीएचडीधारक असून ते या संशोधन लेखाचे सह-लेखक आहे. अल्फ्रेड मॅकईव्हेन (युनिव्हर्सिटी आॅफ अॅरिझोना) यांनीही दुजोरा दिला आहे.
मंगळावर जीवनाचा शोध घेण्यासाठी आजवर वैैज्ञानिक सिद्धांतानुसार जो काही समज होता, त्याला ठोस रुप दिले जाते. रोवर्सच्या शोध यात्रेला मोठे यश आले असून तेथील हवेत अधिक आर्द्रता आहे, असे नासाच्या खगोलशास्त्र विभागाने सांगितले.
------
चार वर्षांपूर्वीही मंगळाच्या पृष्ठभागावर घळींच्या गडद रेघोट्या आढळल्या होता. तथापि, शास्त्रज्ञांकडे ठोस पुरावे नव्हते. नंतर मात्र कळले की, या घळी उन्हाळ्यात वाढायच्या आणि हिवाळा येताच नाहीशा होत. तथापि, घळींच्या या रेघोट्या पाणी प्रवाहाच्याच आहे काय, हे सखोल अभ्यास आणि विश्लेषणाअंतीच सांगता येईल.