Water on Mars : मंगळ ग्रहावर केवळ 3 फुटावर पाण्याचा मोठा साठा, वैज्ञानिकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:19 PM2021-12-17T16:19:16+5:302021-12-17T16:20:05+5:30
सन 2006 मध्ये अमेरिका अंतराळ संस्था नासाने काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्यावेळी, मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुराव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत.
मुंबई - आपल्या कुंडलीत मंगळ ग्रह नसावा असं प्रत्येकाला वाटत असलं तरी, मंगळ ग्रहाबाबत जाणून घ्यायला प्रत्येकाला नक्कीच आवडतं. आता, शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहासंदर्भात एक महत्त्वाची आणि चांगली माहिती दिली आहे. मंगळ ग्रहाच्या ग्रॅन कॅनयनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आल्याची माहिती युरोपीय आंतराळ संस्थांनी दिली आहे. या संस्थांच्या म्हणण्यानुसार, मंगळ ग्रहावर पाण्याचा मोठा साठा आहे.
मंगळ ग्रहावरील वल्लेस मरीनर्स सतहच्या केवळ तीन फूट खाली हा पाण्याचा साठा आहे. वल्लेस मरीनर्स ही 3862 किमी परिसरात पसरलेला मोठा घाट असून तो कैंडोर चाओस घाटाचा एक भाग आहे. वल्लेस मरीनर्स हा घाट नेदरलँडच्या आकाराचा असून या घाटात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असल्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. या शोधनिंबधाचे सहायक लेखक अलेक्सी मलाखोव यांनी सांगितले की, वल्लेस मरीनर्सचा मध्यवर्ती भाग पाण्याने व्यापलेला आहे, असे एका संसोधनातून समोर आले आहे. याठिकाणी अपेक्षापेक्षा जास्त पाणी असल्याचे त्यांनी म्हटले. जमिनीवर बर्फाने झाकोळलेला काही भाग यांसारखाच आहे. कमी तापमानामुळे येथील जमिनीच्या खाली बर्फ जमा झाला आहे.
सन 2006 मध्ये अमेरिका अंतराळ संस्था नासाने काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्यावेळी, मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुराव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत. नासाने जारी केलेल्या फोटोनुसार, 1999 आणि 2001 च्या मध्यावती काळात लिक्वीड वॉटर मंगळ ग्रहावर होते. नासाच्या फोनिक्स मार्स लँडरने मंगळ ग्रहावर बर्फ असल्याबाबत 31 जुलै 2008 रोजी स्पष्टीकरण दिलं होतं. पृथ्वीवर असलेल्या पाण्यातील सत्वच येथील बर्फात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, मंगळावर काही प्रमाणात कोरडवाहू जमिन आणि नदीपात्राचे घाटही दिसून येतात. त्यावरुन, येथे पाणी असल्याचा अंदाज लावता येऊ शकतो. आत्तापर्यंत जे पाणी दिसून आलं ते सखोल प्रमाणात केवळ बर्फ रुपातच होता.