जगाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही लढतोय: नेतान्याहू; इराणी क्षेपणास्त्र धोका जगासाठी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 06:49 IST2026-03-23T06:49:27+5:302026-03-23T06:49:27+5:30
इस्रायलच्या नागरी भागांवर केलेले हल्ले निष्पाप नागरिकांची हत्या करण्यासाठीच; इस्रायलचा दावा

जगाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही लढतोय: नेतान्याहू; इराणी क्षेपणास्त्र धोका जगासाठी गंभीर
जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे जगभरासाठी गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा केला. हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया येथे शनिवारी इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी इराणकडील क्षेपणास्त्रांचा पल्ला युरोपपर्यंत पोहोचू शकतो, असे सांगितले.
सध्याचे युद्ध हे इस्रायल आणि अमेरिका संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी लढत असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या ४८ तासांत इराणने इस्रायलच्या अनेक नागरी भागांवर हल्ले केले. त्यांचा उद्देश निष्पाप नागरिकांची हत्या करणे हा आहे. इस्रायलमधील अराड शहराला भेट देताना त्यांनी या प्रतिक्रिया दिल्या.
इराणने सुमारे ४,००० किमी अंतरावर असलेल्या दिएगो गार्सिया तळावर आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले, ज्यामुळे त्यांची लांब पल्ल्याची क्षमता स्पष्ट होते. त्यांनी सायप्रससह युरोपातील काही भागांवर हल्ल्यांचा उल्लेख करत इराण सर्वांना लक्ष्य करत आहे, असाही आरोप केला.
पवित्र स्थळांजवळ हल्ले
नेतान्याहू यांनी जेरुसलेममधील धार्मिक स्थळांजवळ झालेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. वेस्टर्न वॉल, चर्च ऑफ द होली सेप्युलकर आणि अल अक्सा मशीद अशा तीन प्रमुख पवित्र स्थळांना इराणने लक्ष्य केले असाही आरोप त्यांनी केला.
होर्मुझच्या माध्यमातून ‘जगाला ब्लॅकमेल’
इराण आंतरराष्ट्रीय सागरी व ऊर्जा मार्ग अडवून जगाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप नेतान्याहू यांनी केला. होर्मुझमधील तणावाचा उल्लेख करत त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन कारवाईचे आवाहन केले. त्यांनी इराणचा अणु व क्षेपणास्त्र कार्यक्रम पूर्णपणे निष्प्रभ करणे, इराणी जनतेला सत्तांतरासाठी परिस्थिती निर्माण करणे, ही आमची उद्दिष्टे असल्याचे म्हणाले.
नाटोचा मतभेदांवर पडदा
दुबई : नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि नेटो देशांतील मतभेदाला दुर्लक्ष करत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, आता २० हून अधिक देश एकत्र येऊन या महत्त्वाच्या सागरी मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या आठवड्यात त्यांनी ट्रम्प यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली असून, इराण विरोधातील अमेरिकेची लष्करी कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम जगासाठी धोका असल्याचेही नमूद केले.