अमेरिकेच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही; हिजबुल्लाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 07:47 AM2023-11-04T07:47:37+5:302023-11-04T07:48:10+5:30
संघर्ष वाढविण्याची हिजबुल्लाची धमकी
खान युनूस : हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याने सांगितले की, आम्ही अमेरिकेच्या इशाऱ्यांना अजिबात घाबरत नाही. सध्या सुरू असलेल्या संघर्षात हिजबुल्ला संघटना इस्रायलच्या विरोधात व हमासच्या बाजूने लढत आहे. हा संघर्ष अधिक व्यापक करण्याची धमकीही नसरल्लाह याने अमेरिका, इस्रायलला दिली आहे.
दरम्यान, गाझातील नागरिकांना आणखी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक गोष्टींची मदत पाठविण्यासाठी इस्रायलने परवानगी द्यावी, यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन हे त्या देशात दाखल झाले आहेत. नेमके त्याच वेळेस इस्रायलने गाझाचा वेढा आणखी घट्ट केला आहे. हमास या दहशतवादी संघटनेची गाझातील ठिकाणे इस्रायल सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात येत आहेत.
हमास व इस्रायल यांच्यात सुरू झालेला संघर्ष हा आखाती देशांमध्ये पसरेल, असा इशारा हिजबुल्ला या संघटनेचा नेता हसन नसरल्लाह याने शुक्रवारी दिला होता. गुरुवारी हमासशी संलग्न संघटना हिजबुल्लाने इस्रायलच्या चौक्यांवर ड्रोनने हल्ले केले होते. तसेच तोफगोळ्यांचा मारा केला होता.