आम्ही काश्मिरींना समर्थन देतच राहू- पाकिस्तान
By admin | Published: June 27, 2017 04:51 PM2017-06-27T16:51:12+5:302017-06-27T16:51:12+5:30
भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-यामुळे मोठं यश मिळालं आहे
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 27 - भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकी दौ-यामुळे मोठं यश मिळालं आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनला दहशतवाद्यांच्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं काश्मिरींना समर्थन देण्यासाठी एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
आम्ही काश्मिरी लोकांसाठी कायम आवाज उठवत राहू, असं पाकिस्ताननं सांगितलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून भारतावर कुरघोडी करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला आहे. भारतानं कब्जा केलेल्या जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणा-या कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी घोषित करणं चुकीचं आहे. गेल्या 70 वर्षांपासून काश्मिरी लोकांवर मानवाधिकारांच्या नियमांचं उल्लंघन करत अत्याचार केले जात आहेत, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, काश्मिरी लोकांवर लष्कराकडून पॅलेट गनचा वापर करण्यासोबतच चुकीच्या पद्धतीनं अटक करून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तान गेल्या 70 वर्षांपासून लागोपाठ काश्मिरी लोकांची मदत करतोय. पाकिस्तान काश्मीरला राजनैतिक, नैतिक आणि डिप्लोमेटिक पद्धतीनं समर्थन देत राहील. यासाठी पाकिस्तान यूएन सुरक्षा काऊन्सिलच्या अंतर्गत काम करेल. पाकिस्ताननं काश्मीर खोरं धुसमतं राहण्यासाठी नवी खेळी केली आहे.
मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, गेल्या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सलाउद्दीनचा हात आहे आणि तो काश्मीर खो-यात दहशतवाद पसरवण्याच्या दृष्टीनं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. सलाउद्दीनच्या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं पठाणकोट हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. एप्रिल 2014मध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात 17 लोक गंभीररीत्या जखमी होते. त्यामुळेच हिजबुलच्या सलाउद्दीनला दहशतवादी घोषित करण्यात आले होते.