पाकिस्तानवर कर्ज आम्ही लादले नाही : चीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 06:34 PM2018-09-08T18:34:13+5:302018-09-08T18:34:43+5:30
इस्लामाबाद : कर्जाच्या खाईत आकंठ बुडालेल्या पाकिस्तानची हालत आणखी वाईट बनली आहे. बिजंगच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) च्या नादाला लागल्याने कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. मात्र, चीनने हे आरोप फेटाळून लावत आम्ही पाकिस्तानला कर्ज घेण्यास भाग पाडले नव्हते, अशी कोलांटउडी मारली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे पाकिस्तानमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभुमीवर चीनकडून असे वक्तव्य आल्याने चीनने पाकिस्तानला आता चांगलेच अडकविले आहे. वांग यांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे. कारण BRI च्या करारानुसार चीनने पाकिस्तानला 57 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले होते. तसेच पाकिस्तानात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्याची भेट होत आहे.
हा दौरा भारतासाठीही तेवढाच महत्वाचा आहे. कारण दहशतवादाच्या मुद्द्यावरून नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबविली आहे. यामुळे त्यांचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत.
पाकिस्तानची खराब आर्थिक स्थिती आणि विकासाचा धीमेपणा पाहून चीन पाकला कर्जाच्या जाळ्यामध्ये फसवत असल्याचा आरोप होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून मिळणारे बेल आऊट पॅकेज चीनचे कर्ज फेडण्यासाठी न करण्याचे आदेश अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी जुलैमध्ये दिले होते. पाकिस्तानची हालत एवढी खराब झाली आहे की, इम्राऩ खान यांन अनिवासी पाकिस्तानी नागरिकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की, चीन-पाक आर्थिक उन्नत मार्ग (CPEC) मुळे पाकिस्तानचा विकास दर 2 टक्कयांनी वाढला आहे. यामुळे 70 हजार नोकऱ्याही उपलब्ध झाल्या आहेत. पाकिस्तानला चीनने कर्जाचे ओझे लादले नसून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोठे आर्थिक फायदे होतील. यामुळे पाकच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. तसेच पाकचे 47 टक्के कर्ज आयएमएफ आणि आशियाई बँकेकडून घेतलेले आहे. पाकमध्ये 22 सीपेक प्रकल्पांवर काम होत आहे. ज्यातील 9 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यातून 19 अब्ज डॉलरची गुंतवणूक आली आहे.