CoronaVirus: यंदा आपण कोरोनाला संपवू शकत नाही, पण...; डब्ल्यूएचओचे दावोसमध्ये महत्वाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:18 AM2022-01-19T08:18:01+5:302022-01-19T08:26:37+5:30
CoronaVirus Pandemic End: दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन बोलत होते.
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन वर्षांत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एका मागोमाग एक अशा लाटा येत आहेत. कोरोना व्हायरसचा आज ना उद्या खात्मा होईल या आशेवर तज्ज्ञ, लोक आहेत. असे असताना डब्ल्यूएचओच्या बड्या अधिकाऱ्याने कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही असे वक्तव्य केले आहे.
कोरोना व्हायरससारखे विषाणू कधीच संपत नाहीत. ते परिसंस्थेचा भाग बनतात. परंतू आपण कोरोनामुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपवू शकतो, असे वक्तव्य केले आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन बोलत होते. कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी जगातील सर्व लोकसंख्येला लसीकरण झाले पाहिजे. तरच कोरोना महामारी संपविण्यास मदत मिळेल, असे मत रायन यांनी व्यक्त केले.
२०१९ मध्ये कोरोनाचा पहिल्यांदा चीनमध्ये उद्रेक झाला. यानंतर आजवर जवळपास ३३ कोटी लोक कोरोनाबाधित झाले असून ५५.५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना रायन यांनी आपण हा व्हायरस कदाचित कधीच संपवू शकणार नाही, असे वक्तव्य केले आहे. आपण यंदा जे काही संपवू शकतो ते म्हणजे आरोग्य व्यवस्थेवरील आपत्कालीन परिस्थिती. परंतू, यामागे होणारे मृत्यू, हॉस्पिटलायझेशन आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रणालींचा नाश याचे मोठे आव्हान आहे, असे रायन म्हणाले. यंदा ही आणीबाणी संपविण्याची आपल्याकडे संधी आहे, परंतू त्यासाठी योग्य गोष्टी कराव्या लागतील, असेही रायन म्हणाले.